लाहोर: टी-20 वर्ल्ड कपचा बिगुल वाजण्यापूर्वीच क्रिकेटच्या मैदानात आता बॅट-बॉलपेक्षा शब्दांचेच बाण अधिक सुटताना दिसत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पुन्हा एकदा वादाचे तुणतुणे वाजवले असून, यावेळी त्यांनी बांगलादेशच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) थेट आव्हान दिले आहे. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढण्याचा निर्णय म्हणजे आयसीसीचा 'दुटप्पीपणा' असल्याची गरळ नक्वी यांनी लाहोरमधील पत्रकार परिषदेत ओकली आहे. विशेष म्हणजे, स्वतःच्या घरातले वासे सरळ नसताना नक्वी दुसऱ्याच्या अन्यायावर गळा काढत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
'डबल स्टँडर्ड्स'चा पाढा आणि स्कॉटलंडची एन्ट्री
सुरक्षेच्या कारणास्तव भारतामध्ये खेळण्यास बांगलादेशने असमर्थता दर्शवल्यानंतर आयसीसीने नियमानुसार त्यांना स्पर्धेतून बाजूला सारून स्कॉटलंडला संधी दिली आहे. मात्र, नक्वी यांना हा निर्णय पचनी पडलेला नाही. "आयसीसी एका विशिष्ट देशाच्या (भारताला उद्देशून) सोयीनुसार नियम बदलते," असा आरोप करत त्यांनी आयसीसीच्या 'हायब्रीड मॉडेल' देण्याच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुळात, नियमांचे बोट धरून चालण्यापेक्षा नक्वी यांना 'कोड्यात' बोलायची सवय जडली आहे, अशीच चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.
हेही वाचा: Delhi Police Action: राजधानीमध्ये 'ऑपरेशन कवच' अंतर्गत 70 जण पोलिसांच्या ताब्यात, नेमकं काय घडलंय?
सरकारचा सल्ला की पळवाट?
पाकिस्तानच्या वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत विचारले असता, नक्वी यांनी पुन्हा एकदा चेंडू सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. "पंतप्रधान सध्या देशाबाहेर आहेत, ते परतल्यावर जे ठरवतील तेच आम्ही करू," असे म्हणत त्यांनी एक प्रकारे पळवाट शोधली आहे. जर सरकारने परवानगी नाकारली, तर पाकिस्तानही वर्ल्ड कपमधून माघार घेईल आणि मग आयसीसीला '22 व्या' टीमचा शोध घ्यावा लागेल, असा पोकळ इशाराही त्यांनी दिला. यातून स्वतःच्या देशातील क्रिकेटची ढासळलेली अवस्था सुधारण्याऐवजी नक्वी 'ट्रॉफी चोर' आणि 'धमकी बहाद्दर' म्हणून आपली ओळख अधिक गडद करत आहेत.
हायब्रीड मॉडेलचा राग जुनाच
नक्वी यांनी आपल्या भाषणात 'हायब्रीड मॉडेल'चा उल्लेख करून पुन्हा जुन्या जखमा उकरून काढल्या आहेत. पाकिस्तानला ज्या सवलती मिळाल्या, तशाच बांगलादेशला का नाही, असा त्यांचा सवाल आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अर्थकारण आणि सुरक्षेचे निकष हे केवळ ओरडून बदलता येत नाहीत, हे समजण्याइतपत प्रगल्भता नक्वी यांच्याकडे नाही का? असा प्रश्न आता क्रिकेट तज्ज्ञ विचारत आहेत. एका देशाने दुसऱ्यावर मर्जी लादणे चुकीचे आहे, असे म्हणणाऱ्या नक्वी यांनी आधी स्वतःच्या संघातील अंतर्गत राजकारण थांबवावे, असा सल्लाही नेटकरी देत आहेत.
क्रिकेटच्या हितापेक्षा राजकारणाला प्राधान्य?
एकूणच, मोहसीन नक्वी यांची ही पत्रकार परिषद म्हणजे 'धोरण कमी आणि ओरड जास्त' अशा स्वरूपाची होती. वर्ल्ड कप सारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळण्यापेक्षा बहिष्काराच्या धमक्या देऊन पाकिस्तान स्वतःचेच नुकसान करून घेत आहे. आयसीसी या इशाऱ्याला किती गांभीर्याने घेते हे पाहावे लागेल, पण नक्वी यांच्या या नव्या पवित्र्यामुळे क्रिकेट विश्वात मात्र संतापाचे आणि विनोदाचे वातावरण एकाच वेळी पाहायला मिळत आहे. आता पाहायचे हेच की, पाकिस्तान खरोखर माघार घेतो की ही केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ही एक 'नक्वी-गिरी' ठरते.
हेही वाचा: India-Iran Relations: भारताच्या भूमिकेवर इराण खुश, ट्रम्प संतापले, जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ