नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत संभाव्य कटकारस्थानाची शक्यता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे. दक्षिण - पूर्व दिल्ली जिल्ह्यात हाय अलर्टदरम्यान पोलिसांनी ‘ऑपरेशन कवच-12’ अंतर्गत एकाच वेळी 94 ठिकाणी छापे टाकत गुन्हेगार आणि समाजकंटकांवर कडक कारवाई केली. या कारवाईत एकूण 70 जणांना अटक करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर काही संशयास्पद हालचालींची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. यानंतर तातडीने सतर्कता वाढवण्यात आली. दक्षिण - पूर्व दिल्ली पोलिसांनी 78 विशेष पथकांची स्थापना करून संवेदनशील भागांमध्ये एकाच वेळी छापेमारी केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संशयितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी अनेक संशयास्पद वाहनांना अडवून त्यांची कसून तपासणी केली. तपासात काही वाहनांमधून आक्षेपार्ह साहित्य आढळून आल्याने ती वाहने जप्त करण्यात आली. याशिवाय, अटक करण्यात आलेल्या 70 आरोपींकडून शस्त्रे, अमली पदार्थ आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा: Horrific Road Accident: महामार्गावर मृत्यूचा थरार; ट्रक आणि इनोव्हाच्या धडकेत सहा ठार; कारचा अक्षरशः चक्काचूर
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या अनेक आरोपींचा यापूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध राहिला आहे. हे सर्वजण प्रजासत्ताक दिनापूर्वी एखादी मोठी आणि गंभीर घटना घडवण्याच्या तयारीत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व आरोपींची सखोल चौकशी सुरू असून, यामागे कोणते संघटित कटकारस्थान आहे का, याचा तपास केला जात आहे.
दक्षिण-पूर्व दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ऑपरेशन कवच 12’ चा मुख्य उद्देश प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करणे हा आहे. देशाच्या सुरक्षेला धोका देणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती, हालचाल किंवा वस्तू दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन शांतता आणि सुरक्षित वातावरणात साजरा होईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हेही वाचा: Solar Eclipse 2026: दिवसा पडणार काळोख! 2026 चं पहिलं सूर्यग्रहण ठरणार खास; जाणून घ्या वेळ आणि वैज्ञानिक महत्त्व