PM Modi on Gaza Peace Deal: इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझा पट्टीतील जवळजवळ दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अखेर युद्धबंदीच्या माध्यमातून संपुष्टात आला आहे. सोमवारी हमासने 20 इस्रायली बंधकांना मुक्त केले, तर कराराचा भाग म्हणून इस्रायलने 1,900 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांना सोडले. तथापी, सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्धबंदीचा करार साजरा करण्यासाठी इस्रायलमध्ये पोहोचले. या संपूर्ण प्रक्रियेवर आणि इस्रायली बंधकांच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'दोन वर्षांहून अधिक काळ कैदेत राहिलेल्या सर्व बंधकांच्या सुटकेचे स्वागत करतो. ही सुटका त्यांच्या कुटुंबियांच्या धाडसाला, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या शांततेच्या प्रयत्नांना आणि पंतप्रधान नेतन्याहू यांच्या दृढ निश्चयाला समर्पिक आहे. प्रदेशात शांतता आणण्यासाठी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आम्ही पाठिंबा देतो.'
हेही वाचा - America Shutdown: अमेरिकेतील शटडाऊनमुळे लाखो लोकांचे भविष्य धोक्यात, काय म्हणाले उपाध्यक्ष जेडी व्हान्स?
युद्ध कधी आणि का सुरू झाले?
युद्धाची सुरुवात 7 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती. हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करून मोठा हल्ला केला. यात सुमारे 1,200 इस्रायली नागरिकांचा जीव गेला. त्याच वेळी 250 जणांना बंधक बनवून गाझा येथे नेले गेले. यावर उत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीत हमासविरुद्ध सैन्य कारवाई सुरू केली. स्थानिक हमास आरोग्य अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, या संघर्षात 67,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - India Bangladesh Relations: बांग्लादेशात युनूस सरकारचा धक्कादायक निर्णय; चटगांव पोर्ट चीनच्या हातात, भारताची सुरक्षा धोक्यात
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करारानंतर, डोनाल्ड ट्रम्प सोमवारी सकाळी इस्रायलमध्ये आले. त्यांनी इस्रायली संसद, नेसेटला संबोधित केले. ट्रम्प सोमवारी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांसह शांतता शिखर परिषदेचे सहअध्यक्षत्व करतील. युद्धबंदी करारानंतर, अमेरिका आणि इजिप्तचे अध्यक्ष गाझामधील इस्रायल-हमास युद्ध संपवण्यासाठी जागतिक नेत्यांच्या शांतता शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवत आहेत. तथापी, या युद्धबंदीने दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या इस्रायल-हमास संघर्षाला तात्पुरती स्थिरता दिली आहे. या प्रक्रियेमुळे बंधकांची सुटका आणि आंतरराष्ट्रीय शांततेसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.