Tuesday, November 11, 2025 10:44:25 PM

Putin Warning To America: अमेरिकेच्या टॉमहॉक मिसाइल निर्णयावर पुतिन संतापले; अमेरिकाला दिला थेट हा इशारा...

अमेरिकेकडून युक्रेनला टॉमहॉक मिसाइल पुरवण्याच्या चर्चेवरून रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन संतापले असून त्यांनी अमेरिकेला कठोर इशारा दिला आहे.

putin warning to america अमेरिकेच्या टॉमहॉक मिसाइल निर्णयावर पुतिन संतापले अमेरिकाला दिला थेट हा  इशारा

अमेरिकेने रशियाच्या तेल कंपन्यांवर लादलेल्या नव्या आर्थिक प्रतिबंधांमुळे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता चांगलेच संतापले आहेत. युक्रेनला अमेरिकेकडून टॉमहॉक मिसाइल पुरवण्याच्या चर्चेवरून पुतिन यांनी थेट इशारा देत म्हटले आहे की, “रशियाची प्रतिक्रिया ही चिरडून टाकणारी आणि जगाला हादरवून टाकणारी असेल.”

अमेरिका सध्या युक्रेनला दीर्घ पल्ल्याच्या टॉमहॉक क्रूज मिसाइल देण्याच्या तयारीत आहे. या मिसाइलच्या मदतीने युक्रेनला रशियाच्या हद्दीत खोलवर हल्ले करता येतील, आणि हाच मुद्दा क्रेमलिनसाठी संतापाचा विषय ठरला आहे. पत्रकार परिषदेत जेव्हा पुतिन यांना या निर्णयाबाबत विचारले गेले, तेव्हा त्यांनी कठोर शब्दांत उत्तर देत सांगितले की, “कोणताही स्वाभिमानी देश बाहेरच्या दबावासमोर झुकत नाही आणि रशिया तर अजिबात नाही.”

या पार्श्वभूमीवर ट्रम्प-पुतिन बुडापेस्ट शिखर परिषद रद्द करण्यात आली आहे. या परिषदेत अमेरिका आणि रशियामधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न होणार होता. मात्र, अमेरिकेने रुक ऑयल आणि रोजनेफ्ट या रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादल्याने परिस्थिती अधिक बिघडली आहे. या दोन कंपन्यांमधून रशियाच्या एकूण तेल उत्पादनापैकी जवळपास 50 टक्के उत्पादन घेतले जाते.

हेही वाचा: Bharat Taxi Service : देशात पहिली सरकारी कॅब सेवा! Ola-Uber ला जोरदार टक्कर; ड्रायव्हरही होणार मालक

रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष असलेले दिमित्री मेदवेदेव यांनीही अमेरिकेच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “हे प्रतिबंध केवळ आर्थिक नाहीत, तर हे रशियावर युद्ध छेडण्याच्या समकक्ष आहेत. हा ‘Act of War’ आहे.”

पुतिन यांनी सांगितले की, अमेरिकेचे सर्वाधिक प्रतिबंध ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लादण्यात आले होते, परंतु रशियाने त्यावेळीही हार मानली नाही आणि पुढेही मानणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, बुडापेस्ट बैठक रद्द नाही, फक्त स्थगित करण्यात आली आहे.

अमेरिका वापरत असलेल्या टॉमहॉक मिसाइलची रेंज तब्बल 1600 किलोमीटर इतकी आहे. युक्रेनला ही शस्त्रास्त्रे मिळाल्यास परिस्थिती आणखी धोकादायक होईल, असा इशारा देत पुतिन यांनी म्हटले की, “अमेरिकेने जर हे मिसाइल दिले, तर रशियाची प्रतिक्रिया केवळ प्रत्युत्तर नसेल तर ती इतिहासात नोंद राहील अशी असेल.”

आता जागतिक स्तरावर नवी अस्थिरता निर्माण झाली आहे, कारण पुतिन यांच्या या वक्तव्यानंतर रशिया-अमेरिका तणाव पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.

हेही वाचा: Shashi Tharoor On Trump: डोनाल्ड ट्रम्पच्या तेल खरेदी विधानावर शशी थरूर यांचा पलटवार; म्हणाले, 'भारत स्वतःचे निर्णय घेईल'


सम्बन्धित सामग्री