मालवाहू जहाजाला अपघात; iPhone अन् अत्तराच्या बाटल्या समुद्रात विखुरल्या, व्हिडीओ व्हायरल

संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) एका मालवाहू जहाजाला नौदल सुरुंगाचा (Naval Mine) जोरदार फटका बसल्यामुळे झालेल्या स्फोटात जहाजाला आग लागली आणि ते उलटले.

मालवाहू जहाजाला अपघात; iPhone अन् अत्तराच्या बाटल्या समुद्रात विखुरल्या, व्हिडीओ व्हायरल
iPhone and perfumes floating in sea

मध्यपूर्वेतील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) एका मालवाहू जहाजाला नौदल सुरुंगाचा (Naval Mine) जोरदार फटका बसल्यामुळे झालेल्या स्फोटात जहाजाला आग लागली आणि ते उलटले. या अपघातानंतर जहाजावरील सुमारे 2500 कंटेनर समुद्रात कोसळले, ज्यामध्ये आयफोनचे बॉक्स आणि महागड्या अत्तराच्या बाटल्यांचा समावेश होता. सध्या या वस्तू समुद्राच्या पाण्यात तरंगत असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये काही स्थानिक लोक छोट्या बोटींतून पाण्यात तरंगणाऱ्या या किमती वस्तू गोळा करताना दिसत आहेत.

21 सदस्यीय कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले

सिंगापूरच्या ध्वजाखाली चालवले जाणारे ‘जीएफएस प्राइड’ (GFS Pride) नावाचे हे मालवाहू जहाज दुबईहून माल घेऊन मार्गस्थ झाले होते. बुधवारच्या सुमारास या जहाजावर हा भीषण हल्ला झाला. सिंगापूरच्या ‘मॅरिटाइम अँड पोर्ट ऑथॉरिटी’ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात जहाजावरील सर्व 21 कर्मचाऱ्यांना अत्यंत सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून कोणत्याही कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही. इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) दुजोरा दिला आहे की, हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून अनधिकृत मार्गाने जात असताना नौदल सुरुंगावर आदळल्यामुळे बुडाले. मात्र, सिंगापूर कोस्ट गार्डच्या मते, या जहाजावर एखाद्या अज्ञात शस्त्राद्वारे हल्ला करण्यात आला असावा.

हेही वाचा – खासगी शाळेत हृदयद्रावक घटना! छत कोसळून 27 विद्यार्थ्यांचा मृत्यू; अनेक विद्यार्थी गंभीर जखमी

अमेरिका-इराण संघर्षामुळे जलमार्गावर वाढले तणावाचे वातावरण

गेल्या 10 दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यापूर्वी 6 ऑक्टोबर रोजी अमेरिकन सैन्याने एका इराणी गस्ती बोटीवर आक्रमक कारवाई करत ती नष्ट केली होती. ओमानच्या आखातात ही इराणी बोट अमेरिकन नौदलाच्या जहाजांवर सतत लक्ष ठेवून त्यांना लक्ष्य करत होती. सुदैवाने, बोट नष्ट करण्यापूर्वी त्यावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्यामुळे जीवितहानी टळली. याशिवाय, 23 सप्टेंबर रोजी अँटिग्वा आणि बारबुडाचा ध्वज असलेल्या ‘केप दाओ’ (Cape Dao) नावाच्या जहाजावरही क्षेपणास्त्राचा मारा झाला होता, ज्यामुळे काही आठवड्यांतच ते जहाज याच जलमार्गाजवळ बुडाले. त्या हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

इराणचा असा दावा आहे की, अमेरिकेच्या नेतृत्वाखाली त्यांच्या बंदरांवर लादलेली कठोर नाकाबंदी आणि निर्बंधांच्या निषेधार्थ ही पावले उचलली जात आहेत. जगातील एकूण तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी तब्बल एक-पंचमांश हिस्सा याच जलमार्गातून होतो. मात्र, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे या महत्त्वाच्या जागतिक व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणने ही सामुद्रधुनी व्यापारासाठी बंद करून आपले नियंत्रण अधिक कडक करण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकन नौदलाने या सागरी मार्गावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गस्त तीव्र केली आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number