Effects of Long-term Space Travel on the Body: तब्बल 286दिवस अंतराळ स्थानकात राहिल्यानंतर अखेर भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे सुनीता विल्यम्स व बुच विलमोर पृथ्वीवर परतले आहेत. अवघ्या 8 दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station वर गेलेल्या सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे तांत्रिक अडचणींमुळे तिथेच अडकले. तब्बल 286 दिवसांनंतर ते पृथ्वीवर परतले आहेत. या काळात संपूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना 45 दिवसांच्या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’मध्ये म्हणजेच रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅममध्ये राहावं लागणार आहे!
सुनीता विल्यम्स व बुच विलमोर हे पृथ्वीवर जरी परतले असले, तरी त्यांना लगेच पूर्वीसारखं सामान्य आयुष्य जगता येणार नाही. त्यासाठी त्या दोघांनाही किमान 45 दिवस वाट पाहावी लागणार आहे. इतक्या मोठ्या काळासाठी पूर्णपणे वेगळ्या वातावरणात वास्तव्य केल्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरात झालेले बदल, त्यांच्या शरीराची झालेली झीज किंवा त्यांच्या शरीरानं अंतराळ स्थानकातील वातावरणाशी जुळवून घेतल्याने बदललेल्या गोष्टी या सर्व बाबी पूर्वपदावर येण्यासाठी हा काळ त्यांनी नियोजित उपचार घेणं आवश्यक असेल.
हेही वाचा - सुनिता विल्यम्सने गणपती बाप्पाची मूर्ती सोबत नेली होती! चुलत बहिणीने सांगितलं, सुनिता आहे भारतीय खाद्यपदार्थांचीही चाहती
शरीर पृथ्वीच्या वातावरणानुसार मूळ पदावर येण्यासाठी किमान 45 दिवस लागणार!
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळातून परतल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी 45 दिवसांच्या रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅममधून जावं लागत आहे. या कार्यक्रमात अॅम्ब्युलेशन, स्नायू मजबूत करणे, प्रोप्रियोसेप्टिव्ह व्यायाम आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कंडिशनिंगचा समावेश आहे. उड्डाणानंतरच अशा प्रकारचा रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम ठरवला जातो. लँडिंगच्या दिवशी सुरू होतो आणि यातून सर्वच अंतराळवीरांना जावं लागतं. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी आठवड्यातून सात दिवस दररोज 2 तास हा कार्यक्रम घेतला जात आहे आणि 45 दिवस चालू राहील. तरीही, सुनिता आणि बुच हे दोघे अंतराळात प्रदीर्घ काळासाठी राहिल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा सर्व क्रिया पहिल्यासारख्या करण्यास एका वर्षाचाही कालावधी लागू शकतो. हा रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम एक प्रकारे प्रशिक्षण कार्यक्रमासारखाच असतो. हे अंतराळवीरांच्या विशिष्ट गरजांनुसार तयार केले आहे आणि त्यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणापासून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यास मदत करते.
अंतराळवीर शक्ती, कंडिशनिंग आणि रिहॅबिलिटेशन (ASCR) तज्ज्ञांनी सर्व कमतरतांवर लक्ष केंद्रित करून रिहॅबिलिटेशन कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यामुळे परत येणाऱ्या सर्व अंतराळवीरांची शारीरिक स्थिती सुधारते. ASCR गटात प्रमाणित शक्ती आणि कंडिशनिंग व्यावसायिक, प्रमाणित/परवानाधारक अॅथलेटिक प्रशिक्षक आणि फिजिकल थेरपिस्ट यांचा समावेश आहे आणि ते क्रूला प्री-फ्लाइट, इन-फ्लाइट आणि पोस्ट-फ्लाइट मिशन सपोर्ट प्रदान करतात, ज्यामध्ये व्यायाम हार्डवेअर प्रशिक्षण, व्यायाम प्रिस्क्रिप्शन, पोस्ट-फ्लाइट रिकंडिशनिंग आणि मस्क्यूकोस्केलेटल केअर यांचा समावेश आहे.
काय आहे हा ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’?
साधारणपणे 45 दिवसांचा काळ सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’ अंतर्गत दिवसाचे दोन तास, असे आठवड्याचे सातही दिवस आणि पुढे अशाच नियोजनात एकूण ४५ दिवस तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य ते उपचार घ्यावे लागणार आहेत. या काळामध्ये या दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवरचं वातावरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल व त्यामुळे प्रभावित होणाऱ्या त्यांच्या शरीरातील क्रिया यासंदर्भात सामान्य परिस्थितीत येण्यासाठी मदत केली जाईल.
रिहॅबिलिटेशन कार्यक्रमाचा पहिला टप्पा अॅम्ब्युलेशन, लवचिकता आणि स्नायू मजबूत करण्यावर भर देतो. दुसरा टप्पा प्रोप्रिओसेप्टिव्ह व्यायाम आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कंडिशनिंग जोडतो. तिसरा टप्पा, जो कार्यक्रमाचा सर्वात मोठा टप्पा आहे, तो कार्यात्मक विकासावर लक्ष केंद्रित करतो. सर्व कार्यक्रम प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या चाचणी निकालांनुसार, पसंतीच्या मनोरंजनात्मक क्रियाकलापांनुसार आणि मिशन भूमिका आणि कर्तव्यांनुसार विशेषतः तयार केले जातात.
हेही वाचा - Sunita Williams: अंतराळ स्थानकात 24 तासांत 16 वेळा सूर्योदय अन् सूर्यास्त का होतो? दिवस किती मिनिटांचा असतो?
या ‘अॅक्लमेटायझेशन प्रोग्राम’चे साधारणपणे तीन टप्पे असतील. सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या चाचण्यांच्या निष्कर्षांवर आधारित या प्रत्येक टप्प्यातील बाबी या दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे ठरवल्या जातील.
पहिला टप्पा : या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांना चालणे-फिरणे, शारिरीक लवचिकता आणि स्नायू बळकट करणे यासंदर्भात उपचार दिले जातील.
दुसरा टप्पा : या टप्प्यात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची जाणीव, त्यानुसार शारिरीक क्रियांमध्ये आवश्यक ते बदल, शरीराची जाणीव, आसपासच्या परिस्थितीची जाणीव यांचा समावेश होतो.
तिसरा टप्पा : हा या कार्यक्रमाचा सर्वात अधिक काळ चालणारा टप्पा असेल. या टप्प्यात सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या शारिरीक कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल.
अंतराळात जाऊन परत आल्यानंतर रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम पूर्ण केला जातो. यानंतर, आतापर्यंत असे दिसून आले आहे की, अंतराळवीरांनी त्यांची उड्डाणपूर्व बेसलाइन म्हणजेच आधीची नैसर्गिक स्थिती परत मिळवली आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये त्यात सुधारणा झाली आहे.
सुनीता विल्यम्स यांच्यानावे ‘स्पेसवॉक’ विक्रम!
विल्यम्स आणि विल्मोर यांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान 286 दिवस अंतराळात घालवत असताना 12 कोटी 13 लाख 47 हजार 491 मैलांचा प्रवास केला. या वेळी, पृथ्वीभोवती 4,576 प्रदक्षिणा पूर्ण केल्या, असे नासाने म्हटले आहे. सुनिता यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या तीन अंतराळ वाऱ्यांमध्ये 608 दिवस अंतराळात घालवले आहेत आणि विल्मोर यांनी त्यांच्या तीन अंतराळ कार्यक्रमांमध्ये 464 दिवस अंतराळात घालवले आहेत, असे नासाने म्हटले आहे.
यासह, सुनीता विल्यम्सने आता स्पेस स्टेशनच्या बाहेर 62 तास आणि 6 मिनिटांचा एकूण वेळ अंतराळात घालवण्याचा विक्रम केला आहे. असे करणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत आणि एकूण सर्वाधिक काळ स्पेसवॉक केलेल्या अंतराळवीरांच्या यादीत त्या चौथ्या स्थानावर आहेत.