Crane Collapsed On Running Train in Thailand : थायलंडमध्ये बुधवारी (14 जानेवारी 2026) सकाळी एक भीषण आणि हृदयद्रावक रेल्वे अपघात घडला. बँकॉकहून उबोन रत्चाथानीकडे जाणाऱ्या धावत्या प्रवासी ट्रेनवर अचानक एक अवाढव्य बांधकाम क्रेन कोसळली. हा भीषण अपघात नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात सकाळी 9:05 च्या सुमारास झाला. राजधानी बँकॉकपासून सुमारे 230 किमी अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून 30 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
हायस्पीड प्रकल्पाच्या कामात तांत्रिक बिघाड?
ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तिथे चीनच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या 5.4 अब्ज डॉलर्सच्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू होते. पुलाच्या बांधकामासाठी वापरली जाणारी ही अवजड क्रेन अचानक डब्यांवर कोसळली आणि तिने रेल्वेचे छत अक्षरशः चिरडून टाकले. क्रेनच्या धडकेमुळे रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले आणि काही क्षणातच इंजिनसह काही डब्यांनी पेट घेतला. आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या लोटामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती.
हेही वाचा - Donald Trump : ट्रम्पचा संयम सुटला! कामगारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अश्लील हावभाव करत शिवीगाळ
युद्धपातळीवर बचावकार्य आणि मृतांचा वाढता आकडा
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेचे डबे एकमेकांत अडकल्यामुळे आणि क्रेनचे वजन जास्त असल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत होते. बचाव पथकांनी गॅस कटर आणि हायड्रोलिक उपकरणांच्या साहाय्याने डबे कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने सिखिओ आणि महाराज नाखोन रत्चासिमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ट्रेनमध्ये एकूण 195 प्रवासी आणि कर्मचारी होते, अशी माहिती परिवहन मंत्रालयाने दिली आहे.
या भीषण दुर्घटनेमुळे थायलंडमधील महत्त्वाकांक्षी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित क्रेन तांत्रिक बिघाडामुळे कोसळली की मानवी चुकीमुळे, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश परिवहन मंत्री फिफत रचकितप्राकन यांनी दिले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी, अजूनही काही प्रवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Reliance Industries: चीनची माघार आणि अंबानींची अडचण; भारतातील लिथियम-आयन बॅटरी प्रकल्प रखडला, नेमकं कारण काय?