Thursday, November 13, 2025 08:39:07 AM

Donald Trump: भारतासोबत व्यापार कराराचे ट्रम्प यांनी दिले संकेत; पंतप्रधानांचे कौतुक करत म्हणाले, 'मोदी सर्वात आकर्षक...

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच होणार असल्याचे संकेत दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं कौतुक व्यक्त केलं आहे.

donald trump भारतासोबत व्यापार कराराचे ट्रम्प यांनी दिले संकेत पंतप्रधानांचे कौतुक करत म्हणाले मोदी सर्वात आकर्षक

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  भारतावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दक्षिण कोरियातील ग्येओंगजू येथे झालेल्या APEC CEO परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार करार लवकरच होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले. यावेळी त्यांनी मोदींना 'एक अतिशय चांगले आणि आकर्षक व्यक्तिमत्व' असे संबोधत, 'माझं मोदींवर खूप प्रेम आहे आणि मी त्यांचा आदर करतो,' असे म्हटले.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'मी भारतासोबत व्यापार करार करत आहे आणि मला पंतप्रधान मोदींचा मोठा आदर आहे. आमचं एक उत्तम नातं आहे.' त्यांनी पुढे पाकिस्तानच्या पंतप्रधानांविषयी देखील चांगलं मत व्यक्त करत दोन्ही देशांना 'परमाणु शक्ती असलेले महत्त्वाचे देश' म्हटले.

हेही वाचा: China Data Center: चीनने पाण्याखालील बांधले जगातील पहिले डेटा सेंटर, वैशिष्ट्ये वाचून आश्चर्यचकित व्हाल

तथापि, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी करण्याचा दावा केला; ज्याला भारताने आधी अनेक वेळा फेटाळून लावले आहे. ट्रम्प म्हणाले की, 'मी मोदींना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही पाकिस्तानशी संघर्ष करत असताना आम्ही व्यापार करार पुढे नेऊ शकत नाही. त्यानंतर मी पाकिस्तानलाही तेच सांगितलं.'

भारत सरकारने मात्र याआधीच स्पष्ट केलं आहे की भारत-पाकिस्तानमधील शांती आणि युद्धविरामाचे निर्णय हे “दोन देशांदरम्यानच” घेतले जातात आणि कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी येथे स्वीकारली जाणार नाही.

दरम्यान, भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अलीकडेच स्पष्ट केलं होतं की भारत कोणत्याही दबावाखाली किंवा घाईत व्यापार करार करत नाही. त्यांनी जर्मनीतील Berlin Global Dialogue परिषदेत सांगितले की, “भारत युरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर देशांसोबत सक्रिय चर्चेत आहे, पण आम्ही करार फक्त दीर्घकालीन फायद्यांच्या दृष्टीने करतो.”

हेही वाचा: Indian Rupee Updates: India-Russia Oil Trade: भारतीय रिफायनरींची चिंता वाढली! रशियन तेलवाहू जहाज भारतात न पोहोचता माघारी वळलं

सध्या अमेरिका भारतावर रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल 25 टक्के आयात शुल्क लावत आहे. याशिवाय भारतीय वस्तूंवर आधीच 25 टक्के परस्पर शुल्क लागू आहे. त्यामुळे भारतीय निर्यातीवर एकूण जवळपास 50 टक्के अतिरिक्त कराचा भार आहे. भारताने या शुल्कांना 'अन्यायकारक आणि अवास्तव' असे संबोधले आहे.

ट्रम्प यांच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, येत्या काही महिन्यांत भारत-अमेरिका संबंधांमध्ये नवा टप्पा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


सम्बन्धित सामग्री