Sunday, January 25, 2026 08:53:37 AM

H1B Visa Rules: सोशल मीडियावर पोस्ट केली तर व्हिसा कॅन्सल? अमेरिकेची नवी खेळी

अमेरिकेच्या H1B व्हिसा धोरणात मोठा बदल करण्यात आला असून सोशल मिडिया तपासणी, अर्ज रद्द होण्याचा धोका आणि अपॉइंटमेंट 2026 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय यामुळे लाखो भारतीय नोकऱ्यांवर संकट बनले आहे.

h1b visa rules सोशल मीडियावर पोस्ट केली तर व्हिसा कॅन्सल अमेरिकेची नवी खेळी

H1B Visa Rules: भारत आणि अमेरिकेमधील व्यापार व रोजगार संबंधांवर पुन्हा तणावाचे ढग दाटताना दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये भारताविरोधात टॅरिफ वाढवणे, H-1B व्हिसा शुल्क प्रचंड वाढवणे असे अनेक निर्णय घेतले होते. आता याच मालिकेत आणखी एक कडक पाऊल उचलले असून, त्याचा सर्वाधिक परिणाम भारतीय IT व्यावसायिक, इंजिनिअर्स आणि अमेरिकेत करिअरचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांवर होणार आहे.

अमेरिकेच्या H-1B व्हिसा धोरणात नव्या नियमांची घोषणा करण्यात आली आहे. या नियमांनुसार, व्हिसा अर्ज करणार्‍यांच्या सोशल मीडिया अकाउंटची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. कोणत्याही पोस्ट, कमेंट किंवा फोटोमधून जर अमेरिकेविरोधी मत, राष्ट्रीय सुरक्षेला धोका किंवा संशयास्पद सामग्री आढळली, तर अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल. व्हिसा मिळाल्यानंतरही अशा प्रकारचे काही आढळल्यास व्हिसा रद्द करण्याचीही तयारी अमेरिकेने दाखवली आहे.

या नव्या निर्णयामुळे लाखो भारतीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या संधी धोक्यात येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. जगभरातून H-1B व्हिसासाठी होत असलेल्या अर्जांपैकी तब्बल 70 टक्के अर्ज भारतीयांकडून असतात. त्यामुळे या नियमांचा सर्वाधिक फटका भारतालाच बसणार हे स्पष्ट आहे. अमेरिकी कंपन्यांमध्ये भारतीय टेक टॅलेंटची मोठी मागणी आहे, मात्र हा कडक नियम त्या संधींवर विरजण घालू शकतो.

याशिवाय, अमेरिकेतील दूतावासाने व्हिसा अपॉइंटमेंट्स पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भारतीय अर्जदारांच्या मुलाखती 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेत करिअर करण्याची योजना असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे वयक्तिक आणि आर्थिक नियोजन मोठ्या अडचणीत येऊ शकते.

ट्रम्प प्रशासन ‘अमेरिकन जॉब्स फर्स्ट’ या धोरणावर ठाम असल्याचे दिसते. अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी कर्मचाऱ्यांमुळे स्थानिकांना कमी संधी मिळत असल्याची तक्रार ट्रम्प प्रशासनाने अनेकदा केली आहे. त्यामुळे अमेरिकेतील मतदारांना खूश करण्यासाठी हे निर्णय घेतले जात असल्याचे विश्लेषण पुढे येत आहे.

दरम्यान, अमेरिकेने भारताला धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचा भागीदार देश मानले आहे, असं त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा दस्तऐवजामध्ये म्हटलं आहे. एकीकडे मैत्रीचा हात आणि दुसरीकडे रोजगाराच्या संधींवर मर्यादा – या विरोधाभासामुळे भारतीय धोरणकर्त्यांसमोरही नवीन आव्हान उभे राहिले आहे.

नव्या नियमांचा तातडीने काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, एक गोष्ट निश्चित – अमेरिकेत जाण्याचे स्वप्न आता अधिक कठीण आणि धोकादायक बनले आहे


सम्बन्धित सामग्री