Trump Tariff Bomb: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जागतिक व्यापारविश्वात खळबळ उडवणारा निर्णय घेतला आहे. त्यांनी 1 नोव्हेंबरपासून अमेरिकेत आयात होणाऱ्या मध्यम आणि जड ट्रक तसेच त्यांच्या सुट्या भागांवर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच आयात केलेल्या बसवर 10 टक्के कर लागू केला जाणार आहे.
ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की हे टॅरिफ राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव लादले जात आहेत. यामागचा उद्देश अधिकाधिक ऑटो उत्पादन अमेरिकेतच हलवण्याचा आहे. तथापि, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका मेक्सिकोला बसणार आहे, कारण तो अमेरिकेला मध्यम आणि जड ट्रक पुरवणारा प्रमुख निर्यातदार देश आहे.
या नव्या आदेशानुसार, अमेरिकन ऑटोमेकर्सना 2030 पर्यंत देशातच एकत्र केलेल्या वाहनांसाठी 3.75 टक्के क्रेडिट मिळणार आहे. हे क्रेडिट आयात केलेल्या सुटे भागांवरील वाढीव कराची भरपाई करण्यास मदत करेल. यामुळे पीटरबिल्ट, केनवर्थ, आणि फ्रेटलाइनर सारख्या अमेरिकन कंपन्यांना थेट फायदा होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा - US Singer Mary Millben : ‘तुमच्या 'I Hate India Tour' वर परत जा’; अमेरिकन गायिका मेरी मिलबेन यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
नवीन टॅरिफमध्ये श्रेणी 3 ते 8 या सर्व प्रकारच्या ट्रकचा समावेश आहे. यात मोठे पिकअप्स, मालवाहू ट्रक, डंप ट्रक, तसेच 18-चाकी ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी या निर्णयाला अमेरिकन उत्पादकांचे संरक्षण असे संबोधले आहे. दरम्यान, यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने या निर्णयाचा विरोध करत ट्रम्प यांना आवाहन केले होते की अशा टॅरिफमुळे अमेरिकेच्या सहयोगी देशांशी असलेले व्यापारसंबंध बिघडू शकतात.
हेही वाचा - Rishi Sunak : 'संरक्षणवादी जगात भारताने दाखवली सकारात्मक दिशा'; ऋषी सुनक यांचे भारताच्या धोरणाचे कौतुक
रिपब्लिकन सिनेटर बर्नी मोरेनो यांनी मात्र या निर्णयाचं समर्थन करत सांगितलं की, नवीन क्रेडिट धोरणामुळे अमेरिकन कंपन्यांना उत्पादन देशांतर्गत आणण्याचं मोठं प्रोत्साहन मिळेल. या निर्णयामुळे अमेरिकन ऑटो उद्योगात मोठी हालचाल सुरू झाली असून, जागतिक वाहन बाजारात याचा व्यापक परिणाम दिसून येणार आहे.