नवी दिल्ली - आज जागतिक कर्करोग दिन आहे. या अनुषंगाने एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फुफ्फुसांचा कर्करोग फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच होतो, असं बऱ्याच काळापासून मानलं जात आहे. पण एका नवीन संशोधनाने ही धारणा पूर्णपणे बदलली आहे. लॅन्सेटच्या एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसांचा कर्करोग आता वेगाने वाढत आहे.
लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही फुफ्फुसांच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि याचे एक प्रमुख कारण वायू प्रदूषण हे असू शकते. हे संशोधन इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या शास्त्रज्ञांनी केलं आहे. यामध्ये, ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी 2022 मधील डेटाचे विश्लेषण करण्यात आले , ज्यात असे आढळून आले की, एडेनोकार्सिनोमा नावाचा फुफ्फुसाचा कर्करोग धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त आढळतो. संशोधनातून असेही दिसून आले की 2022 मध्ये, जगभरातील फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 53-70% प्रकरणे अशा लोकांमध्ये आढळली ज्यांनी कधीही धूम्रपान केले नव्हते.
एडेनोकार्सिनोमा म्हणजे काय?
एडेनोकार्सिनोमा हा फुफ्फुसांच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे जो शरीरात श्लेष्मा आणि पाचक द्रव तयार करणाऱ्या ग्रंथींमध्ये विकसित होतो. विशेषतः महिला आणि आशियाई देशांमध्ये हा कर्करोग झपाट्याने वाढत आहे. या अभ्यासात असेही म्हटले आहे की, या प्रकारच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धूम्रपानाशी फारसा संबंध नाही. परंतु, वायू प्रदूषण आणि वातावरणात असलेले सूक्ष्म कण (पीएम 2.5) हे त्याचे एक प्रमुख कारण असू शकतात.
हे वाचा - World Cancer Day : लठ्ठपणामुळे कर्करोगाचा 10-15 टक्क्यांनी वाढतो, वेळीच करा हे उपाय
वायू प्रदूषण बनत आहे कर्करोगाचे कारण!
संशोधकांच्या मते, जगभरात फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांमध्ये वायू प्रदूषण हे एक प्रमुख कारण आहे. विशेषतः पीएम 2.5 सारखे प्रदूषक कण फुफ्फुसांमध्ये खोलवर जातात आणि पेशींना नुकसान पोहोचवतात आणि कर्करोगाचा धोका वाढवतात. 2022 मध्ये, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या महिलांच्या 80,378 प्रकरणांचा थेट संबंध वायू प्रदूषणाशी असल्याचे आढळून आले.
हे वाचा - साउंड स्लीप म्हणजे काय ?
महिला आणि आशियाई देशांमध्ये जास्त धोका!
फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंमध्ये पाचपैकी एक मृत्यू धूम्रपान न करणाऱ्या लोकांचे आहेत, असेही या अभ्यासातून समोर आले आहे. ही समस्या विशेषतः महिला आणि आशियाई देशांमध्ये वेगाने वाढत आहे. आयएआरसीचे मुख्य शास्त्रज्ञ फ्रेडी ब्रे म्हणाले की, आज फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या वाढत्या घटनांमागे बदलत्या धूम्रपानाच्या सवयी आणि वायू प्रदूषण हे दोन मुख्य घटक आहेत. हे टाळण्यासाठी सर्वच देशांच्या सरकारांना तंबाखू नियंत्रण आणि वायू प्रदूषण नियंत्रण धोरणे लागू करावी लागतील.
अस्वीकरण: ही बातमी फक्त सामान्य माहितीवर आधारित आहे. याबाबत डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.