वॉशिंग्टन: युक्रेनवरील सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर मोठी कारवाई केली आहे. बुधवारी अमेरिकेने रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले. या निर्णयाचा उद्देश मॉस्कोवर दबाव आणून रशियाला तात्काळ युद्धविराम मान्य करण्यास भाग पाडणे हा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील चर्चाही निष्फळ ठरल्याने ही कडक भूमिका घेण्यात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या निर्बंधांबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे अत्यंत कठोर निर्बंध आहेत, पण आम्ही अपेक्षा करतो की ते फार काळ टिकणार नाहीत. आम्हाला आशा आहे की युद्ध लवकर संपेल. प्रत्येकवेळी मी व्लादिमीर पुतिनशी बोलतो, संवाद चांगला होतो पण त्यानंतर काहीच पुढे घडत नाही, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा: Government On DeepFake Content : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या डीपफेक कंटेंटवर लगाम; सरकारचा नवा कायदा लवकरच लागू
अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी सामाजिक माध्यम X वर लिहिले की, आता हत्या आणि विध्वंस थांबवण्याची वेळ आली आहे. पुतिन यांनी हे निरर्थक युद्ध संपवण्यास नकार दिल्यामुळे रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. या कंपन्या क्रेमलिनच्या युद्धयंत्रणेला निधी पुरवतात. जर आवश्यक झाले तर ट्रम्प यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी आणखी पावले उचलली जातील. तसेच मित्रदेशांनाही या निर्बंधात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अमेरिकेच्या खजिना विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशियाने युक्रेन युद्ध संपवण्यासाठी कोणताही ठोस आणि गंभीर प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे आज घोषित केलेले निर्बंध रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावर अधिक आर्थिक दबाव आणतील आणि क्रेमलिनची युद्धासाठी निधी उभारण्याची क्षमता कमी करतील. तसेच कमजोर झालेल्या रशियन अर्थव्यवस्थेला आणखी धक्का बसेल. अमेरिका शांततेसाठी सातत्याने प्रयत्न करत राहील, मात्र कायमस्वरूपी शांतता रशियाच्या प्रामाणिक संवाद इच्छेवर अवलंबून आहे.
या कारवाईमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर रशियाच्या ऊर्जा व्यापारावर मोठा परिणाम होईल. पाश्चात्य देशांनीही या निर्बंधांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा वॉशिंग्टनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या या निर्णायक भूमिकेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, रशियाने युद्ध थांबवून संवाद आणि कूटनीतीच्या मार्गाने तोडगा काढावा, अन्यथा आणखी कठोर निर्बंधांचा सामना करावा लागेल.
हेही वाचा: भारत रशियाकडून तेल खरेदी करणे कमी करेल; मोदींशी फोनवर संवाद साधल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पचा यांचा मोठा दावा