Year Ender 2025: सत्ता, संघर्ष आणि टॅरिफ वॉर…! 2025 मधील जगाला नव्याने आकार देणाऱ्या प्रमुख जागतिक घडामोडी

सत्तांतराचे वारे, सीमेवरील रक्तरंजित संघर्ष, आर्थिक निर्बंध आणि बदलती राजनैतिक समीकरणे यामुळे या वर्षाने संपूर्ण जगाला एका नवीन वळणावर आणून ठेवले आहे.

Year Ender 2025: सत्ता, संघर्ष आणि टॅरिफ वॉर…! 2025 मधील जगाला नव्याने आकार देणाऱ्या प्रमुख जागतिक घडामोडी

Year Ender 2025: वर्ष 2025 हे मानवी इतिहासातील आणि जागतिक राजकारणातील एक अत्यंत वादळी आणि परिवर्तनीय वर्ष म्हणून नोंदवले जाईल. सत्तांतराचे वारे, सीमेवरील रक्तरंजित संघर्ष, आर्थिक निर्बंध आणि बदलती राजनैतिक समीकरणे यामुळे या वर्षाने संपूर्ण जगाला एका नवीन वळणावर आणून ठेवले आहे. या वर्षात घडलेल्या अशा काही महत्त्वाच्या घटना, ज्यांनी जागतिक पटलावर कायमचा प्रभाव टाकला:

1. डोनाल्ड ट्रम्प यांचे सत्तेत पुनरागमन आणि 'अमेरिका फर्स्ट' धोरण

नोव्हेंबर 2024 च्या निवडणुकीतील विजयानंतर, जानेवारी 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आक्रमक बदल पाहायला मिळाले. याचा सर्वाधिक परिणाम जागतिक व्यापार आणि हवामान बदलाच्या करारांवर झाला आहे.

2. भारत-पाकिस्तान संघर्ष: 'ऑपरेशन सिंदूर'

दक्षिण आशियातील शांतता 22 एप्रिल रोजी भंग पावली, जेव्हा जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना प्राण गमवावे लागले. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित 'TRF' ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. भारताने याला जशास तसे उत्तर देत 7 मे रोजी पाकिस्तान आणि PoJK मधील 9 दहशतवादी तळांवर 'Operation Sindoor' अंतर्गत हवाई हल्ले केले. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत.

3. रशिया-युक्रेन युद्धाचा पेच कायम

अनेकांना वाटले होते की सत्तापालटानंतर रशिया-युक्रेन संघर्ष थांबेल, परंतु 2025 मध्येही रशिया-युक्रेन युद्ध सुरूच राहिले. नाटो (NATO) आणि रशिया यांच्यातील तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. ट्रम्प प्रशासनाने शांततेसाठी प्रयत्न केले असले तरी, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

हेही वाचा – Terror Network in Pakistan : पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा नवीन राजकीय चेहरा? 'सेंट्रल मुस्लिम लीग' आणि काश्मीर कनेक्शन

4. मध्य-पूर्वेत महासत्तांचा हस्तक्षेप; इराण-इस्त्रायल तणाव

2025 च्या पहिल्या सहामाहीत मध्य-पूर्व प्रदेश युद्धाच्या उंबरठ्यावर उभा होता. इस्त्रायलने इराणच्या अणुसुविधांवर हल्ले केले, ज्याला इराणनेही प्रत्युत्तर दिले. या संघर्षात अमेरिकेने थेट हस्तक्षेप करत इराणच्या 3 मुख्य ठिकाणांना Fordo, Natanz आणि Isfahan ला लक्ष्य केले. अखेरीस 12 दिवसांच्या भीषण संघर्षानंतर युद्धविराम झाला, मात्र या प्रदेशातील अस्थिरता कायम आहे.

5. अमेरिका-चीन 'टॅरिफ युद्धा'चा फटका   

जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध हा चिंतेचा विषय ठरला. वॉशिंग्टनने चिनी उत्पादनांवर उच्च शुल्क (Tariffs) लादल्यामुळे बीजिंगनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या 'टॅरिफ वॉर'मुळे जागतिक पुरवठा साखळी (Supply Chain) विस्कळीत झाली असून महागाईत वाढ झाली आहे.

हेही वाचा – India America Trade Deal: दोस्ती अपनी जगह, टॅरिफ अपनी जगह! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर भारताचा मास्टरस्ट्रोक

6. दक्षिण आशियातील राजकीय अस्थिरता आणि आंदोलने

शेजारील देशांमध्येही मोठ्या घडामोडी घडल्या:

नेपाळ: भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीच्या विरोधात झालेल्या जनक्षोभामुळे के.पी. ओली यांचे सरकार कोसळले.

पाकिस्तान: माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आणि त्यांच्या प्रकृतीबाबतच्या माहितीसाठी देशभर निदर्शने झाली.

बांगलादेश: हिंसक गोळीबार आणि जातीय तणावाच्या घटनांमुळे बांगलादेशसह भारतातही त्याचे पडसाद उमटले. 

दरम्यान, वर्ष 2025 संपत असताना जग एका विचित्र कोंडीत सापडले आहे. एकीकडे तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना, दुसरीकडे जुन्या सीमावादांनी डोके वर काढले आहे. बदलत्या भू-राजकीय युती आणि आर्थिक धोरणे 2026 कडे पाहताना जगाला एका नव्या आव्हानासाठी सज्ज करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number