राज्याच्या तिजोरीवरील वाढता आर्थिक ताण आणि दुष्काळी संकट लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना काटकसरीच्या सूचना दिल्या आहेत. विभागांच्या निधी खर्चात 20 टक्के कपात करण्यास सांगण्यात आले असून, रस्ते आणि सिंचन प्रकल्पांवरील अनावश्यक खर्च टाळण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, शिक्षण, आरोग्य, कर्जमुक्ती आणि लाडकी बहीण यांसारख्या योजनांच्या निधीत कपात न करता जलसंधारण, पाणीपुरवठा आणि चारा योजनांना प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 31 ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी 16 कोटींहून अधिक खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आगमनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये हेलिपॅड उभारण्याकरिता 2.47 कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला. मात्र, प्रस्तावाची पूर्वछाननी न झाल्याने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी नाराजी व्यक्त केली.
गोदावरीचे पाणी मिळावे आणि वांजरगाव, खानापूर व कमलपूर या तीन केटी बंधाऱ्यांत तातडीने पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील पुलावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.
दुरबारच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, कापसाला प्रतिक्विंटल 9 हजार 500 ते 10 हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सीसीआयच्या हमीभावापेक्षा बाजारातील दर अधिक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव शहरात 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने जाहीर केला आहे. मात्र, या निर्णयाची माहिती आपल्याला प्रशासनाने न देता माध्यमांतून मिळाल्याने महापौर दीपमाला काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची फोनवर कानउघाडणी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील गोलवाडी येथील ‘द मेपल लॉन अँड रेस्टॉरंट’चा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने तातडीने निलंबित केला आहे. आकस्मिक तपासणीत रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छता, गंजलेला फ्रिज, कच्चे आणि शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवणे यांसह अन्न सुरक्षेच्या अनेक त्रुटी आढळल्या.
शेतजमिनीच्या मोजणीसाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे.
रेल्वे रुळ ओलांडताना वंदे भारत एक्स्प्रेसची धडक बसल्याने महिलेचा मृत्यू या अपघातात सोहीनी देवी श्रीश्रीमाल (66, रा. अहमदाबाद) यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला
दुष्काळाची दाहकता आता इतकी वाढलीय की, जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांवर वैरणीला कुलूप लावण्याची वेळ आलीय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतरवाली खांडी गावात चारा-पाण्याचं संकट गंभीर बनलंय.
FDA अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील दोषींवर निलंबनासह कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.
दुष्काळी मदत आणि वनहक्क मागण्यांवर सकारात्मक चर्चा. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठवडाभरापासून सुरू असलेले आदिवासींचे ठिय्या आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान घडलेल्या चेंगराचेंगरीसदृश दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे
मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. वडाळा पश्चिम येथील एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळील चार रस्ता परिसरातील आर. ए. किदवाई रोडवर ओला कारमधून आलेल्या आरोपींनी एका व्यक्तीवर तीन राऊंड गोळीबार केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अमरावती शिक्षक मतदारसंघात प्रा. दत्तात्रय लहाने, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात दिलीप घुगे आणि पुणे पदवीधर मतदारसंघात सुनील मोदी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते अॅड. हर्षल प्रधान यांनी ही माहिती दिली.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे दुर्गापूजेच्या मंडपात मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर कोलकात्यातील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना कोलकाता मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पावसामुळे मंडप परिसरात मोठी धावपळ उडाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच मंडपाचा काही भाग कोसळल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.