विशाल राऊत, प्रतिनिधी
वाशिम : वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दोन गटात वाद निर्माण झाला होता. दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही घरावर गुलाल पडला आणि त्यानंतर हा वाद उफाळून आला होता. यादरम्यान शहरात काही ठिकाणी दगडफेक झाल्याने शहरातील वातावरण तापले होते. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून हा वाद मिटवून विसर्जन मिरवणूक पार पाडली. दगडफेक करणाऱ्या चार जणांची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना झाली आहेत. शहरात राज्य राखीव पोलीस दल, शीघ्रकृतीदल, पोलीस आणि होमगार्डचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काय आहे घटना
वाशिमच्या मालेगाव शहरात दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण झाले होते. टिपू सुलतान चौक परिसरात मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. मिरवणुकी दरम्यान उधळलेला गुलाल विशिष्ट समाजातील व्यक्तीच्या घरावर गेल्याने दुर्गा मंडळ आणि काही तरुणांमध्ये बाचाबाची झाली होती. जमावाने काही दुचाकी आणि अन्य वाहनांची तोडफोड देखील केली होती. दरम्यान, दगडफेक करणाऱ्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात जमाव आला होता. दक्षतेच्या कारणास्तव दगडफेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती वाशिमच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांनी दिली. तसेच राज्य राखीव पोलीस दल आणि शीघ्रकृती दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या मालेगाव शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.