आजारपण व कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत धुळ्यातील एका गरीब मजूर कुटुंबाची नाशिकमध्ये अघोरी पूजा व जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 1 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या प्रसिद्ध गोदाघाटावर पीडित महिलेला अघोरी स्नान घालून तिच्या डोळ्यात लिंबाचा रस पिळण्यात आल्याचेही समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील पीडित महिला मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकते. सततच्या आजारपणामुळे त्या आर्थिक अडचणीत होत्या. त्यांच्या दोन मैत्रिणींनी नाशिकहून धुळ्यात आलेल्या सरिता जाधव या मांत्रिक महिलेशी त्यांची ओळख करून दिली. यावेळी तांत्रिक महिलेने 21 वर्षीय मुलीवर दुर्धर आजाराचा प्रभाव असल्याचे सांगून तिला धुळ्यातील माहेरीच्या घरी सुमारे 40 दिवस ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान, मांत्रिक महिलेने पीडितेला गोदाघाटावर नेऊन अघोरी स्नान घातले. तिच्या अंगावरून उतारलेल्या लिंबाचा रस थेट डोळ्यात पिळले.
त्यानंतर 24 जुलै 2026 रोजी मांत्रिक महिलेने मुलीला जबरदस्तीने साखरपुडा उरकून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर संशयितांनी पीडित कुटुंबाशी संपर्क तोडला. इतकचं नव्हे तर पीडितेच्या डोक्याचे केस उपटून स्मशानात पूजा करावी लागेल, असे सांगत 11 अमावस्या व 10 पौर्णिमेला नाशिकला येऊन उतारे करण्याचे सांगून 1 लाख 51 हजार रुपयांची मागणी केली. तसेच अंगावरील वस्त्रे नदीत फेकून नवीन कपडे घालण्यास भाग पाडले. त्यानंतर खोबरे व पेढा खायला दिल्याने पीडितेला मळमळ व उल्टी झाली. फसवणूक झाल्यानंतर पीडित महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला.
समितीच्या कार्यकर्त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत पोलिसांत जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर 27 सप्टेंबर 2026 रोजी धुळे शहर पोलिस ठाण्यात अघोरी प्रथा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात धुळे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नाशिकमधून मांत्रिक महिला सरिता जाधव आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. आरोपींवर विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धुळे शहर पोलिस करीत आहेत.