अहिल्यानगर : शहरातील गजबजलेल्या बालिकाश्रम रोड परिसरात ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र रामभाऊ चव्हाण (वय 55 ) हे बालिकाश्रम रोड परिसरात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत रविंद्र चव्हाण यांना उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचार करण्याचे प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी
चव्हाण यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी परिस्थितीची माहिती घेत संबंधितांशी चर्चा केली.
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बालिकाश्रम रोड परिसरात धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र तसेच इतर पुरावे मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे.
अज्ञात हल्लेखोराची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. आरोपी हल्ल्यानंतर कोणत्या दिशेने पसार झाला, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, रविंद्र चव्हाण यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. गजबजलेल्या परिसरात सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.