अहिल्यानगर: वृद्धांना सुरक्षित आसरा मिळावा म्हणून उभारलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. विळद घाट परिसरातील या वृद्धाश्रमात वास्तव्यास असलेल्या एका वृद्धाने सहकारी वृद्धांवर लोखंडी रॉडने अचानक हल्ला केला. या भीषण प्रकारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्री वृद्धाश्रमात राहणारा राजू घुले हा पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक संतप्त झाला आणि झोपेत असलेल्या सहकारी वृद्धांवर लोखंडी रॉडने वार करण्यास सुरुवात केली. अनेक जण झोपेत असल्याने त्यांना बचावाची संधीही मिळाली नाही. काही क्षणांतच वृद्धाश्रमात गोंधळ उडाला आणि आरडाओरड सुरू झाली.
Pimpri Chinchwad: धक्कादायक घटना! पोलीस कर्मचाऱ्याने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य; बस डेपोमध्ये…
या हल्ल्यात मंकाळेश्वर हेणे आणि दत्तात्रेय हारके यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश घोडके, बाळासाहेब घाडगे, गोरख फुंदे, साहेबराव भवर, लिंबराज फिसके आणि संतोष पिरगल हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या उजव्या हाताला थरथर होत असल्याने काही सहकारी त्याची चेष्टा करत असल्याचा दावा समोर आला आहे. याच कारणाचा राग मनात धरून त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि मानसिक स्थितीबाबत अधिक तपास सुरू आहे.
या प्रकरणी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक दिलीप चोरडिया यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून हल्ल्यासाठी वापरलेली लोखंडी रॉड जप्त केली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू घुले हा कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी (कुंभारी) येथील रहिवासी आहे. तो अविवाहित असून नोव्हेंबर २०२५पासून मातोश्री वृद्धाश्रमात राहत होता. विशेष म्हणजे, त्याची बहीण त्याला परत घरी घेऊन जाण्यासाठी नाशिकहून येत होती. मात्र ती वृद्धाश्रमात पोहोचण्यापूर्वीच हा रक्तरंजित प्रकार घडल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
दरम्यान, या घटनेनंतर वृद्धाश्रमातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वृद्धांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांची मागणी होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.