पिंपरी-चिंचवड : गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील विजय कोळी या पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह अखेर आढळून आला आहे. निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील बस डेपोमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. त्यांनी सरकारी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय कोळी हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत होते. कौटुंबिक कलहातून ते दोन दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. घरातून जाताना त्यांनी सरकारी पिस्तुल सोबत नेल्याने पोलिस विभागाची चिंता वाढली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला.
हेही वाचा: ‘Paneer’ शब्दाच्या वापरावरच निर्बंध? FSSAIचा मोठा प्रस्ताव; नेमका नियम काय?
विजय कोळी हे निगडी येथील दुर्गा देवी टेकडी परिसरात शेवटचे दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरात शोधमोहीम राबवली. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातूनही परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता.
दरम्यान, शनिवारी सकाळी निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर येथील बस डेपो परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. तपासानंतर हा मृतदेह विजय कोळी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सरकारी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
विजय कोळी यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे RTPC म्हणून नियुक्ती असल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण काय होते, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी काय होती आणि घटनेपूर्वी त्यांच्या हालचाली कशा होत्या, याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.