उत्तर प्रदेश: बुलंदशहर जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. प्रेमसंबंधातील वादातून 21 वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराने आणि त्याच्या कुटुंबीयांनी पेटवून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू असताना आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मृत तरुणीचे नाव कशिश मीना असे असून ती बुलंदशहरमधील शिकारपूर परिसरात राहत होती. कशिशचे गेल्या तीन वर्षांपासून त्याच भागातील आशिष नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. सुरुवातीला दोन्ही कुटुंबांना या नात्याची माहिती होती आणि त्यास विरोध नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी आशिषने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. यानंतर दोघांमध्ये तणाव वाढल्याचे सांगितले जात आहे.
जाब विचारताच घडला भीषण प्रकार
25 एप्रिल रोजी कशिशने आशिषला याबाबत विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर आशिष आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून तिच्यावर ज्वलनशील पदार्थ ओतून आग लावल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, ती 90 टक्क्यांहून अधिक भाजली होती.
हेही वाचा: Pune Bhor Nasrapur Case Update:'ही मारामारीची किरकोळ केस, त्यात मला गोवण्यात आलंय...', नसरापूर प्रकरणातील नराधमाचं धक्कादायक उत्तर, काय घडलं न्यायालयात?
आठवडाभर मृत्यूशी झुंज
सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू असताना कशिशने आठवडाभर जीवासाठी संघर्ष केला. मात्र अखेर शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनानंतर कुटुंबीयांनी हंबरडा फोडला असून परिसरात शोककळा पसरली आहे. महत्त्वाचे म्हणजे उपचारादरम्यान कशिशने अधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला होता. या जबाबाला तपासात महत्त्वाचे स्थान मिळणार असून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे.
आरोपी अटकेत, चौकशी सुरू
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आशिष, त्याचा भाऊ विवेक कुमार आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे. तसेच निष्काळजीपणाबद्दल काही स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: Crime News: प्लंबरने किरकोळ वादातून महिलेला संपवलं; 5 महिन्यांनंतर स्वयंपाकघराच्या जमिनीखाली सागाडा सापडल्याने झाला गुन्ह्याचा उलगडा
न्यायासाठी कुटुंबीयांची हाक
कशिशच्या वडिलांनी मुलीला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या या क्रूर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.