अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या प्राणघातक गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील तपासाचे धागेदोरे आता थेट गुजरातपर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी गुजरात मधील बडोदा येथून अंकित नावाच्या आठव्या संशयित आरोपीला तावडीत घेतले आहे. त्याला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात येत असून, या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटात 2 महिलांचाही सहभाग असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. परदेशात विशेषतः कॅनडामध्ये सेटल करण्याचे आमिष आणि कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देऊन मुख्य सूत्रधार अनिल पंडित याने या गरजू तरुणांना गोळीबाराच्या कटात ओढल्याची माहिती उघड झाली आहे.
कडक सुरक्षेमुळे टायगरला केले लक्ष्य
पोलीस तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींचा कट केवळ टायगर श्रॉफपुरता मर्यादित नव्हता, तर त्यांनी अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांसारख्या बॉलिवूडच्या दिग्गजांनाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रिक्षाचालकांची मदत घेऊन वांद्रे परिसरात फिरून या अभिनेत्यांच्या घरांची रेकी करण्यात आली होती. मात्र, या बड्या कलाकारांच्या निवासाभोवती अत्यंत कडक आणि भेदण्यासारखी सुरक्षा व्यवस्था नसल्याने आरोपींनी टायगर श्रॉफकडे आपला मोर्चा वळवला. टायगर दर वीकेंडला फुटबॉल खेळण्यासाठी जात असल्याचे समजताच, 18 ऑक्टोबर रोजी जुहूच्या मैदानाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला.
अक्षय कुमारच्या घराला बुलेटप्रुफ सुरक्षा
या घटनेनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत भीतीचे वातावरण पसरले आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर अक्षय कुमारचेही नाव असल्याचे आणि त्याच्या घराची रेकी झाल्याचे स्पष्ट झाल्याने, सुरक्षेचा उपाय म्हणून अक्षयने आपल्या निवासाला बुलेटप्रुफ काचा बसवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच त्याच्या घराबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे, या हल्ल्यात वापरलेली एक देशी आणि एक परदेशी पिस्तूल आरोपींनी पळून जाताना अज्ञात ठिकाणी फेकून दिली होती. ही दोन्ही घातक शस्त्रे शोधून काढण्याचे आणि कटाचा मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर उभे राहिले आहे.