टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या तपासाला नवं वळण मिळालं आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राधा आणि बबिता या दोन महिलांसह कुणाल आणि सुमित अशा चार आरोपींना अटक केली आहे. कुणाल आणि सुमितने राधा-बबिता या दोन तरुणींना शस्त्रे पुरवली, ज्यांनी ती शस्त्रे मुंबईतील दादर येथे नेऊन प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या शूटर्सच्या स्वाधीन केली. तपासानुसार, या महिला आरोपींनी शस्त्रांची व्यवस्था करण्यासह मुंबईत पिस्तूल पोहोचवण्यात कथित भूमिका बजावली. अशातच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सुरुवातीला हल्लेखोरांच्या टार्गेटवर आधी टायगर श्रॉफ नव्हतातच, असा मोठा खुलासा आरोपींच्या प्राथमिक चौकशीत झाला.
टायगर श्रॉफ नाही तर, होती टार्गेटवर ‘ही’ व्यक्ती
समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईत एका मोठ्या व्यक्तीला मारण्यासाठी आले होते. आरोपींना आधी ठरवलेल्या टार्गेटपर्यंत सहज न पोहोचता आल्याने त्यांनी टायगर श्रॉफवर हल्ला केल्याचे पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे. यासंबंधित आरोपींच्या टार्गेटवर असलेल्या त्या व्यक्तीची माहिती समोर आली आहे. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या निशाण्यावर असलेल्या व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तो अभिनेता सलमान खान असल्याची शक्यता आहे.
आरोपींनी टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यापूर्वी आमिर खान, अमिताब बच्चन, अक्षय कुमार आणि सलमान खानच्या घराचीही रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहून आरोपी माघारी फिरले. त्यानंतर टायगर श्रॉफसोबत पोलीस बंदोबस्त नसतो हे त्याच्या चाहत्यांच्या रील्सवरून कळल्याने आरोपींनी टायगर श्रॉफला लक्ष्य केले. त्यानुसार, श्रॉफ आणि त्याच्या चाहत्यांच्या इन्स्टाग्रामवरून हल्लेखोरांनी रेकी करत टायगर श्रॉफच्या मुव्हमेंट ट्रेस केल्या होत्या. त्यामुळे टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आरोपींच्या निशाण्यावर अभिनेता सलमान खान होता का? असा प्रश्न निर्माण होत आहे.