जळगावातील माउली नगरात 40 वर्षीय कर्मचाऱ्याची चॉपरने हत्या करण्यात करण्यात आल्याची घटना दसऱ्याच्या रात्री घडली. किरण विठ्ठल पाटील असे मृताचे नाव असून, किशोर छगन पाटील हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत. रात्री उशिरा महामार्गालगत ही घटना घडली. दरम्यान, दांडिया खेळणाऱ्या महिलांवर दुचाकीचा हेडलाइट चमकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
माउली नगरात दुर्गा मंडळाच्या वतीने गरबा-दांडिया सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी महिलांवर हेडलाइट चमकवला. यावरून विचारणा केली असता वाद वाढला. दरम्यान, किरण पाटील आणि किशोर पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एका संशयिताने चॉपर काढून किरण यांच्या छातीत वार केले.
यात त्यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणात मयूर जाधव, रोहित पाटील आणि अन्य एका संशयिताचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर तिघेही पसार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर