आमगाव : जमीन व्यवहाराचे पैसे परत करावे लागतील, या भीतीतून आरोपीने माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये लाखो रुपये गमावल्यानंतर पैशांची परतफेड करण्यास असमर्थ ठरलेल्या आरोपीने दहीकर यांच्यावर विटेने वार करून त्यांचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक गुन्हे शाखा आणि आमगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा उलगडा करत आरोपीला अटक केली.
जमीन व्यवहार रद्द झाल्याने पैशांचा तिढा
मृत चंद्रशेखर दहीकर हे आमगाव तालुक्यातील आपल्या शेतातील निवासस्थानी एकटेच राहत होते. सप्टेंबर 2026 मध्ये त्यांनी आमगाव येथील जमीन विक्रीचा व्यवहार केला होता. या व्यवहारात आरोपी अजय ब्राह्मणकर (वय 21) याने मध्यस्थी केली होती. जमीन खरेदीसाठी ठरलेल्या व्यवहारानुसार खरेदीदाराकडून पाच लाख रुपये टोकन म्हणून घेण्यात आले होते. त्यापैकी चार लाख रुपये अजयच्या बँक खात्यात ठेवण्यात आले होते.
मात्र, जमिनीच्या कागदपत्रांमध्ये अडचणी निर्माण झाल्याने खरेदी-विक्रीची नोंदणी होऊ शकली नाही. त्यामुळे जमीन व्यवहार रद्द करण्याची वेळ आली आणि खरेदीदाराला टोकनची रक्कम परत करणे आवश्यक झाले.
हेही वाचा: मंचर-भीमाशंकर मार्गावर भीषण अपघात; इको कार दरीत कोसळून 2 जणांचा अंत, 4 जण गंभीर जखमी
ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये साडेतीन लाख रुपये गमावले
दहीकर यांनी आरोपी अजयकडे त्याच्या खात्यात ठेवलेले चार लाख रुपये परत मागितले होते. मात्र, आरोपीने त्यातील सुमारे साडेतीन लाख रुपये शेअर बाजारातील ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गमावले होते. त्यामुळे त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी पुरेशी रक्कम शिल्लक नव्हती.
पैशांची मागणी केली जाईल आणि आपल्याला परतफेड करावी लागेल, या भीतीतून आरोपीने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
रात्री विटेने वार करून हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने चंद्रशेखर दहीकर यांच्या डोक्यावर आणि छातीवर विटेने वार केले. या हल्ल्यात दहीकर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
स्थानिक गुन्हे शाखा आणि आमगाव पोलिसांनी संयुक्त तपास करत 24 तासांच्या आत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.