मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) पदाधिकारी गणेश चुक्कल यांच्यावर मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पवई येथील उच्चभ्रू हिरानंदानी परिसरातील एका बड्या रिअल इस्टेट विकासकाची आर्थिक फसवणूक करणे आणि त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चुक्कल यांच्यावर आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि बांधकाम व्यवसायात मोठी खळबळ उडाली आहे. विकासकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्राथमिक तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
बनावट लीज डीड तयार करून केला गैरप्रकार
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण हिरानंदानी भागातील ‘ओडोनियो’ या टोलेजंग इमारतीतील फ्लॅट क्रमांक 3505 शी संबंधित आहे. आरोपी गणेश चुक्कल यांनी या अलिशान फ्लॅटचे बनावट भाडेकरारपत्र (Fake Lease Deed) आणि खोटी कागदपत्रे तयार केली. या बनावट दस्तऐवजांचा गैरवापर करून त्यांनी विकासकाची आर्थिक फसवणूक केली आणि त्यानंतर कायदेशीर कारवाईची भीती दाखवून खंडणीची मागणी केली, असा थेट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. फसवणुकीचे प्रकार समोर आल्यानंतर विकासकाने तत्काळ पवई पोलिसांत धाव घेतली होती.
बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा तपास सुरू
अटकेनंतर पवई पोलिसांनी आरोपी गणेश चुक्कल यांना न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बनावट कागदपत्रे नेमकी कुठे आणि कोणी तयार केली, या आर्थिक फसवणुकीच्या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच खंडणीच्या रकमेचा माग काढण्यासाठी आरोपीची सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चुक्कल यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पवई पोलीस पुढील तपास करत असून आणखी काही मोठी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.