छत्रपती संभाजीनगरातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या दांपत्यांनी चक्क एका महिन्याच्या बाळाचा 1.20 लाखांत सौदा केला. विशेष म्हणजे या आई- वडिलांनी बाळ विक्री केल्यानंतर त्या पैशातून दागिने आणि स्मार्टफोन मोबाईल ही खरेदी केले. एक लाखात विक्री झालेल्या या बाळाची विक्री वाढत वाढत साडे तीन लाखांपर्यंत पोहोचली होती. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, बाळाला सुरक्षित ताब्यात घेण्यात आलं आहे. या संपूर्ण व्यवहाराची साखळी छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडमार्गे तेलंगणापर्यंत पोहोचल्याचं तपासात समोर आलं आहे.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात 19 सप्टेंबर रोजी वंदना कांबळे नावाची महिला मारहाणीची तक्रार घेऊन आली. या तक्रारीच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर बाळ विक्रीचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. वंदना कांबळे आणि तिच्या पतीला काही महिन्यांपूर्वी बाळ झालं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, या दांपत्याने हे बाळ सीमा रेषवाल नावाच्या महिलेला एक लाख वीस हजार रुपयांत दिलं. या व्यवहाराच्या बदल्यात दागिने आणि मोबाईल घेण्यात आल्याचा आरोप आहे. बाळाच्या व्यवहारासाठी बॉण्ड पेपर तयार करण्यात आल्याची माहितीही तपासात समोर आली.
हेही वाचा- कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट! बीडमध्ये मुलाने वडिलांवर झाडली गोळी; तिघे अटकेत
सीमा रेषवाल आणि तिची आई कौशल्या पवार यांनी हे बाळ पडेगाव येथील संगीता आव्हाड हिला दोन लाख सत्तर हजार रुपयांना दिलं होत. त्यानंतर संगीताने नांदेड गाठत डॉक्टर सुरेश गुंटुका याला हे बाळ तब्बल साडेतीन लाख रुपयांना विकल्याचं तपासात समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, बाळाचा हा व्यवहार नांदेड रेल्वे स्थानकावर झाला. पैसे आणि बाळाची देवाणघेवाणही रेल्वे स्थानकावरच झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
बाळाच्या विक्रीच्या सौद्याचे टप्पे
पहिला सौदा :
जन्मदात्यांनी 1 लाख 20 हजार रुपये घेऊन बाळ सीमा रेशवालला दिले.
दुसरा सौदा :
सीमाने हे बाळ पडेगाव येथील संगीता आव्हाड हिला 2 लाख 70 हजार रुपयांत विकले.
तिसरा सौदा :
संगीताने नांदेड गाठून बोगस डॉक्टर सुरेश गुंटुका याला बाळ 3 लाख 50 हजारांत विकले.
चौथा टप्पा:
डॉ. सुरेशने हे बाळ हैदराबाद येथील नातेवाईक उमा खटकम हिला साडेतीन लाखांतच सुपूर्द केले.
यानंतर हे बाळ तेलंगणातील निजामाबाद परिसरातून करीमनगर रोडवर राहणाऱ्या उमा खटकम हिच्याकडे पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. म्हणजेच, छत्रपती संभाजीनगरपासून नांदेडमार्गे तेलंगणापर्यंत बाळ विक्रीचं नेटवर्क कार्यरत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
हेही वाचा- मेडिकल स्टोअरच्या आडून नशेच्या औषधांची विक्री? कळंबोलीत मोठी कारवाई, तिघांना अटक
दरम्यान पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे, मुकुंदवाडी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना कांबळे आजारी पडल्यानंतर तिला आपल्या बाळाची आठवण झाली. तिने सीमा रेषवालकडे बाळ परत मागितलं. मात्र बाळ परत देण्यास नकार देण्यात आला आणि याच कारणातून मारहाणीचा प्रकार घडल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. मात्र पोलिसांनी बाळाची कागदपत्रे आली असल्याचं सांगून आरोपींना चिखलठाणा परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणात बाळ सुरक्षित असून, पोलिसांकडून संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे. या बाळ विक्रीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, बाळांच्या अशा व्यवहारामागे आणखी मोठं नेटवर्क आहे का, याचा तपास आता मुकुंदवाडी पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.