सातारा शहरात एका शिक्षक दांपत्याच्या 17 वर्षीय मुलीने डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव सातारा पोलिसांनी काही तासांतच उघडकीस आणला आहे. आज सकाळी 112 क्रमांकावर आलेल्या कॉलनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयास्पद परिस्थितीचा कसून तपास केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय मृत मुलीला चुकीच्या संगतीमुळे उद्धट वर्तनाची सवय लागली होती. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी पालकांनी तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन व वैद्यकीय उपचारही सुरू केले होते. मात्र, मुलीच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. शनिवारी तपासात रात्री टीव्हीच्या आवाजावरून वाद झाला असल्याचे समोर आले.
रागाच्या भरात मुलीने लहान बहिणीला मारहाण केली. त्यानंतर ती बॅट घेऊन वडिलांच्या अंगावर धावून गेली. या वेळी संतप्त झालेल्या पुरुषोत्तम यांनी तिच्या हातातील बॅट हिसकावून थेट तिच्या डोक्यात मारली. ज्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. मूळचे चंचळी (ता. कोरेगाव) येथील रहिवासी असलेले पुरुषोत्तम कदम व त्यांची पत्नी शीला हे दोघेही व्यवसायाने शिक्षक आहेत.
रविवारी सकाळी त्यांनी मुलगी बेशुद्ध असल्याचे भासवले. तसेच रक्ताचे डाग पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळाची पाहणी आणि फॉरेन्सिक पथकाच्या तपासातून पोलिसांचा संशय बळावला. या घटनेनंतर मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.