सुखी संसाराचा भयानक शेवट! संशयाचं भूत डोक्यात शिरलं अन् नवऱ्याने…; छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक घटना

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरात चारित्र्याच्या संशयातून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून हत्या केली.
crime
crime

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन कॉलनी येथे सोमवारी पहाटे ही घटना घडली. रोहिणी मुकेश कुंभकर्ण (वय ४२) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणातील आरोपी पती मुकेश कुंभकर्ण याने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी आणि मुकेश यांच्यात मागील सहा ते सात महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुकेशने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रोहिणी झोपेत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रोहिणी यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर आरोपी मुकेश सकाळी सातच्या सुमारास दुचाकीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, हत्येमागील नेमकी परिस्थिती आणि संबंधित बाबींचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी रोहिणी यांनी गजानन कॉलनीतील महिलांना एकत्र करून उत्साहात देवीची स्थापना केली होती. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत त्या परिसरातील महिलांसोबत पारंपरिक गरबा खेळल्या. त्यानंतर त्या घरी जाऊन झोपल्या होत्या. मात्र, काही तासांतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

या घटनेमुळे कन्नड शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version