औषध दिल्यानंतर अचानक नाकातून रक्तस्राव, नवजात बाळाचा मृत्यू; खोपोलीतील हॉस्पिटलमध्ये खळबळ

खोपोलीतील सुमित्रा राज हॉस्पिटलमध्ये औषध दिल्यानंतर नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

औषध दिल्यानंतर अचानक नाकातून रक्तस्राव, नवजात बाळाचा मृत्यू; खोपोलीतील हॉस्पिटलमध्ये खळबळ
khopoli

रायगड/खोपोली : खोपोलीतील सुमित्रा राज हॉस्पिटलमध्ये नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर काही दिवसांनी ड्रेसिंगसाठी रुग्णालयात आलेल्या महिलेच्या बाळाला औषध दिल्यानंतर अचानक रक्तस्राव सुरू झाला आणि त्यानंतर बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाजिया मुस्तफा जळगावकर या प्रसूतीनंतर पाच दिवसांनी ड्रेसिंगसाठी सुमित्रा राज हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत नवजात बाळही होते. रुग्णालयात डॉक्टरांनी बाळाची तपासणी केली असता त्याला कावीळ झाल्याचे सांगण्यात आले.

यानंतर डॉक्टर केजरीवाल यांनी बाळासाठी औषध लिहून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित औषधाचे चार थेंब बाळाला देण्यात आले. औषध दिल्यानंतर काही वेळातच बाळाच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

बाळाची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. मात्र, तपासणीनंतर बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, औषध दिल्यानंतरच बाळाची प्रकृती अचानक बिघडल्याचा दावा करण्यात येत आहे.

दरम्यान, बाळाच्या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, औषधामुळे ही घटना घडली की अन्य कोणत्या वैद्यकीय कारणामुळे बाळाचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. या सर्व बाबींचा तपास शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयातील वैद्यकीय प्रक्रियेबाबतही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे नवजात बाळाच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number