महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.
live update maharashtra
live update maharashtra

LIVE NEWS & UPDATES

  • 27 Oct 2026 10:15 AM (IST)

    दुष्काळात शेतकऱ्यावर संकट; येवला तालुक्यात जनावरांचा चारा आगीत भस्मसात

    येवला तालुक्यातील नगरसुल येथे साठवून ठेवलेल्या मक्याच्या चाऱ्याला आग लागून तब्बल 27 ट्रॉल्या चारा जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत शेतकरी प्रमोद मुरलीधर पाटील यांचे मोठे नुकसान झाले असून, आधीच दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर आता जनावरांच्या चाऱ्याचे नवे संकट ओढवले आहे. शॉकसर्किट आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

  • 27 Oct 2026 09:48 AM (IST)

    किसान सभेचा लाँग मार्च जुन्या कसारा घाटात दाखल

    इगतपुरी येथून किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने रवाना झालेला असून लाँग मार्च ठाणे जिल्ह्यातील जुन्या कसारा घाटात दाखल आहे. यामध्ये हजारोच्या संख्येने मार्च मध्ये लोक सहभागी आहेत. पुढील मुक्काम ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे चार वाजता मुख्यमंत्र्याशी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाची अतिथी गृहावर बैठक होणार असून बैठकीत मागण्यांवर ठाम निर्णय न झाल्यास मार्च आगेकूच करणार आहे.

  • 27 Oct 2026 09:41 AM (IST)

    येवला शहरातील स्वामी समर्थ केंद्रात चोरी; दानपेटीतील रोकड आणि सीसीटीव्ही डीव्हीआर गायब

    येवला शहरातील पारेगाव रोड परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी केंद्रातील दानपेटी फोडून त्यातील अंदाजे ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच केंद्रातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही चोरून नेला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरी येवला शहरात चोरट्याचा सुळसुळाट वाढला असून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

  • 27 Oct 2026 09:27 AM (IST)

    गुहागर-विजापूर महामार्गावर एसटी बस आणि कारची जोरदार धडक

    गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि कारची जोरदार धडक होऊन अपघात झाला आहे. गुहागर आणि चिपळूणदरम्यान झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. धडक इतकी जोरदार होती की मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती; मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

  • 27 Oct 2026 09:08 AM (IST)

    दिवाळी तोंडावर अन् दोन आदिवासी कुटुंबांचे संसार आगीत खाक

    दिवाळीचा सण तोंडावर असताना हेद्रुज पवारवाडीतील दोन आदिवासी कुटुंबांचा संसार आगीत जळून खाक झाला. सोपान बुधा केदारी आणि शिवाजी बुधा केदारी यांची घरे या आगीत भस्मसात झाली. अडीच ते तीन तोळे सोने, एक लाख ९० हजार रुपये रोख, धान्य, कपडे आणि संसारोपयोगी साहित्य जळून नष्ट झालं. आधीच दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या कुटुंबांसमोर आता नव्याने संसार उभा करण्याचं आव्हान आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • 27 Oct 2026 08:49 AM (IST)

    चिपळूण-संगमेश्वरच्या शाळा-अंगणवाड्यांत आता ‘स्मार्ट’ शिक्षण

    ग्रामीण भागातील चिमुकल्यांनाही आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अनुभवातून शिकता येणार आहे! चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये थ्रीडी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीवर आधारित स्मार्ट शिक्षणाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कोयना भूकंप निधीतून १ कोटी ६० लाख रुपये खर्चून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सावर्डे येथे झाला. या माध्यमातून दोन्ही तालुक्यांतील १० शाळा आणि ५० अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी मिळणार आहे.

  • 27 Oct 2026 08:21 AM (IST)

    उद्धवसेनेचा रास्ता रोकोचा

    जळगाव तालुक्यातील कुसुंबे आणि मण्यारखेडा येथे जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे रखडल्याने गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तब्बल ९ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना २०२२ मध्ये सुरू होऊनही अद्याप ५० टक्के काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप उद्धवसेनेने केला आहे. या कामांना तातडीने सुरुवात करून गती द्यावी, अशी मागणी करत उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड यांना निवेदन दिले. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे

  • 27 Oct 2026 07:56 AM (IST)

    नाशिकच्या रामकुंडावर ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळा

    ३१ ऑक्टोबरला नाशिकच्या रामकुंडावर ऐतिहासिक धर्मध्वजारोहण सोहळा
    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी होणार ध्वजारोहण
    कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंडावरील धर्मध्वजारोहणाची तयारी पूर्णत्वाकडे
    मुख्य धर्मध्वजासह गंगा-गोदावरी मंदिरावरील ध्वज सज्ज
    मुख्य धर्मध्वजाला सुवर्ण जरीची किनार आणि पारंपरिक धार्मिक सजावट
    मुख्य धर्मध्वजाची रुंदी १५.५ फूट, तर उंची ५ फूट
    मुख्य धर्मध्वजाला १५ घंटा, १२ रेशमी गोंडे आणि ३ घुंगरूंची सजावट
    गंगा-गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ आणि सिंहस्थ समितीकडून ध्वजांची रचना व सजावटीची माहिती
    आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version