तेजस होमतुरे, प्रतिनिधी
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा आमदार कोण होणार, हे आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून नागपूर विभागीय क्रीडा संकुलात सुरुवात करण्यात आली आहे. एकूण 84 टेबलवर मतमोजणी केली जाणार असून, एकूण 38 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर नंतर पहिला कल समोर येण्याची शक्यता असून, रात्री 8 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुधाकर कोहळे, काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी, तर महाविकास आघाडीतून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून नितेश कराळे मास्तर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : मध्य रेल्वेच्या गोंधळानंतर आजचा दिवस कसा? प्रवाशांचं लक्ष महत्त्वाच्या अपडेटकडे
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात एकूण 64.76 टक्के मतदान झाले आहे. 2 लाख 55 हजार 603 मतदारांपैकी 1 लाख 65 हजार 541 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीदरम्यान पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या आणि पुढील पसंतीच्या मतांची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी मतमोजणीच्या सर्व फेऱ्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निकाल | Graduates Constituency Election Results