लग्नासाठी योग्य जोडीदाराचा शोध घेणाऱ्या मंत्रालयातील एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची ‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’द्वारे तब्बल 17 लाख 97 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयातील एका महत्त्वाच्या विभागात कार्यरत असलेल्या पीडित महिला अधिकाऱ्याने (बदलेले नाव सागरिका) लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर स्वतःचे प्रोफाइल तयार केले होते. याचा गैरफायदा घेत सुनील नावाच्या भामट्याने स्वतःला ब्रिटनचा (UK) नागरिक असल्याचे सांगून त्यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. हळूहळू विश्वास संपादन केल्यानंतर महागड्या भेटवस्तू पाठवल्याचे सांगून, कस्टम क्लिअरन्स आणि विविध कारणांसाठी त्याने सागरिका यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
दुसऱ्या आरोपीकडूनही कॅनडाचे नाव सांगून फसवणूक
याच काळात विशाल नावाच्या आणखी एका भामट्याने सागरिका यांच्याशी संपर्क साधला. त्याने आपण कॅनडामध्ये वास्तव्यास असून लग्नासाठी इच्छुक असल्याचे भासवले. कौटुंबिक अडचणी, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि कागदपत्रांची पूर्तता अशा खोट्या सबबी सांगून त्यानेही पीडित महिला अधिकाऱ्याकडून वेळोवेळी ऑनलाईन पैसे वर्ग करून घेतले. दोन्ही आरोपींच्या बनाव आणि भुलथापांना बळी पडून सागरिका यांनी वेगवेगळ्या खात्यांवर टप्प्याटप्प्याने एकूण 17 लाख 97 हजार रुपये भरले.
लग्नाबाबत टाळाटाळ सुरू झाल्याने फसवणूक उघडकीस
काही दिवसांनंतर आरोपींकडून वारंवार पैशांची अतिरिक्त मागणी होऊ लागली आणि लग्नाच्या विषयावर टोलाटोली सुरू झाली. त्यामुळे संशय आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे महिला अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी कोणताही विलंब न करता मुंबईतील दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही अज्ञात आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ज्या बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर केले गेले आणि ज्या फोन क्रमांकांवरून संवाद साधला जात होता, त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे भामट्यांचा शोध घेतला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.