मुलुंडमध्ये सुरू असलेल्या PAP प्रकल्पात अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. टाटा नगर परिसरात आज दुपारी दीड-दोनच्या सुमारास बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या झोपड्यांना आग लागल्याची दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग ग्राउंड प्लस वन या कर्मचारी विभागाला लागली आहे. या बांधकाम ठिकाणी आतापर्यंत सहा ते आठ वेळा सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचा तपास सुरु असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नसल्याचे सांगण्यात आले आहे.