मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महालक्ष्मी पुलावर आज सकाळी दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुजरातकडून मुंबईच्या दिशेने दगड घेऊन येणाऱ्या ट्रकचा महालक्ष्मी पुलावर अचानक पुढील टायर फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला जोरात धडकला. या भीषण धडकेमुळे दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा – आई-वडिलांच्या समोर पोटच्या लेकीचा अंत; तर पालकांची प्रकृती चिंताजनक; नेमकं घडलं काय?
दरम्यान, अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सुमारे दीड ते दोन तास वाहतूक सर्व्हिस रस्त्यावर वळवली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.