नागपुरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये महिला मैत्रिणीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह नागपूरच्या हिंगणा येथील स्वतःच्या रिकाम्या घरात पुरल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. संतोष भगवान साखरकर असे आरोपी शिक्षकाचे नाव असून, वैशाली विलास टिपले असे मृत महिलेचे नाव आहे.
नेमके काय घडले?
पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष आणि वैशाली यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी वाद झाला होता. या वादातून संतोषने चंद्रपूर येथे वैशालीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर त्याने मृतदेह एक दिवस कारच्या डिक्कीतच ठेवला. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी तो मृतदेह कारने हिंगणा येथील आधारनगरी परिसरातील स्वतःच्या रिकाम्या घरात घेऊन आला. तिथे खोलीत खड्डा खोदून मृतदेह पुरला आणि त्यावर फरशी बसवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
सीडीआरवरून आरोपी जाळ्यात
दरम्यान, वैशाली बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी चंद्रपूर पोलिसात दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू करताना मोबाईलच्या कॉल डिटेल्स (CDR) तपासले. त्यात वैशाली शेवटच्या वेळी संतोषच्या संपर्कात असल्याचे समोर आले.
पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून हिंगणा पोलिसांच्या मदतीने शनिवारी रात्री दीड वाजता घरातील फरशी तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास चंद्रपूर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे हिंगणा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
या प्रकरणामुळे वैशालीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर स्थानिकांमध्ये दहशतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे.ही विकृती समाजासाठी घातक असून ती वेळीच ठेचायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.