नागपुरात चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; शाळेत शिक्षिकेला सांगितली आपबिती, भाडेकरूला अटक

नागपूरच्या पाचपावली परिसरात चॉकलेटचे आमिष दाखवून 7 वर्षांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
नागपुरात चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार; शाळेत शिक्षिकेला सांगितली आपबिती, भाडेकरूला अटक

नागपूर : लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका 47 वर्षीय भाडेकरूला अटक केली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर आहे. शाळेत झालेल्या सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाविषयीच्या जनजागृतीदरम्यान मुलीने शिक्षिकेला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

शिक्षिकेला सांगितली आपबिती

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश कनोजिया हा मुलीच्या कुटुंबाच्या घरी भाड्याने राहत होता. त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास मुलीच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

दरम्यान, शाळेत मुलांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत माहिती दिली जात असताना मुलीने शिक्षिकेकडे आपली व्यथा मांडली. शिक्षिकेने तत्काळ पालकांना शाळेत बोलावून या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी मुलीशी संवाद साधला आणि संपूर्ण प्रकार समोर आला.

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

मुलीच्या पालकांनी या प्रकरणी पाचपावली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version