नवी मुंबईतील ऐरोली आणि खारघर परिसरातील VIBGYOR हायस्कूलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही शाळांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर धमकीचा संदेश पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शाळा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे. शाळांमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऐरोली आणि खारघर येथील VIBGYOR हायस्कूलच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा संदेश प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये खलिस्तान आर्मीचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यालाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या धमकीच्या संदेशामुळे शाळा प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने आवश्यक खबरदारी घेतली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले, तर शाळेतील नियमित कामकाजाबाबतही सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला.
पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा आगामी २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शाळांना धमकीचे ई-मेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात आहे.
मात्र, शाळांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलचा आणि दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमाचा नेमका काय संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही घटनांमधील संभाव्य संबंध तपासातूनच समोर येऊ शकतो.
धमकीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही शाळांच्या परिसरात तपासणी आणि शोधमोहीम सुरू केली. शाळेच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आहे का, याची पाहणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, त्यामागील उद्देश काय होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील अधिक तपशील स्पष्ट होणार आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईतील शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.