संदेश कान्हु, प्रतिनिधी
यवतमाळ : साईड देण्यावरून झालेल्या वादातून खासगी प्रवासी वाहनचालकाने मानव विकास बसच्या चालकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना महागाव बसस्थानकाबाहेर घडली. या घटनेत बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे किरकोळ जखमी झाले. दरम्यान या प्रकारामुळे महागाव ते सेनद मार्गावरील सुमारे 20 विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी तासभर प्रतीक्षा करावी लागली. मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव ते सेनद मार्गावर विद्यार्थिनींची वाहतूक करणारी मानव विकास बस (क्र. एमएच 40 वाय 5406) महागाव बसस्थानकाबाहेर आली असताना एमएच 28 एएन 3029 क्रमांकाच्या खासगी प्रवासी वाहनाच्या चालकासोबत साईड देण्यावरून वाद झाला. बसचालक ज्ञानेश्वर वानखेडे यांनी वाहन बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर वाद वाढला. त्यातून खासगी वाहनचालकाने लोखंडी रॉडने वानखेडे यांना मारहाण केली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे बसमधील विद्यार्थिनींची गैरसोय झाली. दरम्यान, महागावचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी चालकाची समजूत काढली. त्यानंतर वानखेडे यांनी पुन्हा बस चालवत विद्यार्थिनींना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविले. जखमी चालकाची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी बसचालकाने महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.