प्रफुल खंदारे, प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बांधकाम व्यावसायिक राकेश तलरेजा यांच्यावर काल रात्री अज्ञाताने अॅसिड हल्ला केला आहे. यात तलरेजा यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना गंभीर इजा झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. राकेश तलरेजा हे मलकापूर येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून ते काल रात्री मलकापूर येथील सिंधी कॉलनी परिसरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ मित्रांशी बोलत उभे होते. त्यानंतर ते घराकडे जाताना अचानक आलेल्या अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर ॲसिड हल्ला केला. यात तलरेजा यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. तात्काळ परिसरातील नागरिकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात हलवलं मात्र त्यांच्या चेहऱ्याची आणि डोळ्यांची गंभीर इजा बघता डॉक्टरांनी त्यांना जालना येथील नेत्र रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवल. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. अद्यापही आरोपी फरार असून या घटनेमुळे मात्र संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तलरेजा यांच्यावर अॅसिड हल्ला कुणी आणि का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : 500 कोटींवरून मनोज जरांगेंचा ‘ऑडिओ बॉम्ब’, कथित ऑडिओ क्लिपमध्ये कोणा कोणाचे नावं?
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update