सातारा: पुणे-बेंगलोर महामार्गावर लिंबजवळ भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिकेच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
नेमकी घटना काय?
सातारा-पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लिंब गावाजवळ ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेनंतर तब्बल अर्धा तास उलटूनही महामार्ग पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला पण ते निष्फळ ठरले, त्यात सरकारी रुग्णवाहिका उशिरा पोहोचली. परिणामी उपचाराच्या ‘गोल्डन अवर’मध्ये वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे दुचाकीस्वाराला प्राण गमवावे लागले.
या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, प्रशासकीय यंत्रणेचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. या दिरंगाईमुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असून, त्यात आणखी एका अपघाताची भर पडली आहे. या अपघातानंतर नागरिकांनी केलेल्या आरोपांमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळतात का, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.