‘हेल्मेट घातलेला पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच…’; प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा CCTV व्हिडीओसह खळबळजनक दावा

गुन्हेगारांनी ऑफिसमध्ये घुसून पूर्णेकरांची निर्घृण हत्या केल्यानंतर सुरुवातीपासूनच कुटुंबीयांच्या संशयाची सुई शिंदे दाम्पत्यावर होती. आता पुत्राने थेट सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करत, गुन्ह्याच्या वेळी हेल्मेट घालून वावरणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून खुद्द राजेंद्र शिंदेच असल्याचा दावा केला आहे.

‘हेल्मेट घातलेला पाचवा आरोपी राजेंद्र शिंदेच…’; प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा CCTV व्हिडीओसह खळबळजनक दावा
Rajendra Shinde CCTV video

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या मृत्यू प्रकरणाने आता एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण घेतले आहे. मृत्यूला 26 दिवस पूर्ण झाल्यानंतर, मृत पूर्णेकर यांच्या मुलाने एका पत्रकार परिषदेत थेट ठाण्याच्या माजी महापौरांच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. गुन्हेगारांनी ऑफिसमध्ये घुसून पूर्णेकरांची निर्घृण हत्या केल्यानंतर सुरुवातीपासूनच कुटुंबीयांच्या संशयाची सुई शिंदे दाम्पत्यावर होती. आता पुत्राने थेट सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करत, गुन्ह्याच्या वेळी हेल्मेट घालून वावरणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून खुद्द राजेंद्र शिंदेच असल्याचा दावा केला आहे.

पूर्णेकर कुटुंबीयांचा पोलिसांवर रोष

पत्रकार परिषदेत बोलताना मृत प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडिलांच्या मृत्यूला 26 दिवस उलटले तरी अद्याप मुख्य सूत्रधाराला अटक झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पोलिसांनी जे तांत्रिक अन्वेषण आणि पुरावे गोळा करायला हवे होते, ते काम आता आमचे कुटुंब करत आहे, असा आरोप त्यांनी केला. तपासादरम्यान पोलिसांनी आतापर्यंत 14 ते 15 सीसीटीव्ही फुटेज दिले असूनही, संशयित राजेंद्र शिंदे यांना अद्याप अटक न झाल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.

पत्रकार परिषदेत काही महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुरावे सादर करत राम पूर्णेकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला. गुन्ह्याच्या अगदी काही मिनिटे अगोदर संशयित आरोपी नितेश पवार, संतोष टल्ली, पप्या शिंदे आणि राजेंद्र शिंदे हे सर्वजण एकाच ठिकाणी एकत्र असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मृत्यूनंतर पोलिसांनी ज्या पाचव्या हेल्मेटधारी आरोपीला अटक केली, तो खरा नसून एक डमी आरोपी असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. ज्या कपड्यांमध्ये राजेंद्र शिंदे हत्येपूर्वी दिसले होते, हुबेहूब तसेच कपडे त्या पाचव्या हेल्मेटधारी व्यक्तीने घातले होते. त्यामुळे तो हेल्मेटधारी व्यक्ती अमित सिंग पपलू नसून प्रत्यक्ष राजेंद्र शिंदेच असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा –  काळीज पिळवटून टाकणारी घटना! पोटच्या नऊ महिन्यांच्या बाळाला स्कायवॉकवरून फेकलं; वडिलांना अटक

राजेंद्र शिंदेंवर सुपारी देऊन गुन्हा घडवून आणल्याचा आरोप

प्रदीप पूर्णेकर आणि राजेंद्र शिंदे यांच्यातील वाद आणि या संपूर्ण गुन्ह्यामागे राजकीय तसेच व्यावसायिक किनार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी सुरुवातीपासून केला आहे. शिंदे दाम्पत्यानेच गुन्हेगारांना सुपारी देऊन हा पूर्वनियोजित कट रचल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. एकामागून एक नवे पुरावे आणि सीसीटीव्ही व्हिडिओ समोर येत असल्याने ठाणे पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आता या नव्या पुराव्यांनंतर पोलीस यंत्रणा काय पावले उचलणार आणि राजेंद्र शिंदेंवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण ठाण्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number