छत्रपती संभाजीनगरमध्ये नात्याला काळिमा फासणारी फसवणुकीची घटना समोर आली आहे. सोन्याचे कडे बनवून देण्याचे आश्वासन देत जावयानेच सासूकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहम नितीन शहाणे, रा. राहुरी, जि. अहिल्यानगर, असे आरोपीचे नाव आहे.
नागेश्वरवाडी परिसरातील सविता किशोर दहिवाळ या घरातूनच सोन्या-चांदीचे व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा जावई सोहम जेवणासाठी घरी आला होता. यावेळी त्याच्याकडे अडीच तोळ्यांच्या सोन्याच्या कड्यांची ऑर्डर देण्यात आली. कडे तयार करून देण्याच्या व्यवहारासाठी सविता आणि त्यांच्या मुलाने सोहमच्या बँक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवले.
टप्प्याटप्प्याने एकूण 4 लाख 3 हजार 260 रुपये सोहमच्या खात्यावर जमा करण्यात आले. पैसे मिळाल्यानंतर मात्र त्याने सोन्याचे कडे देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. ऑर्डर दुसऱ्या दिवशी सकाळी मिळेल, असे सांगून तो तेथून निघून गेला.
मात्र त्यानंतर सोहमचा फोन बंद येऊ लागला. कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी सोहमने त्या व्यापाऱ्याकडे सोन्याच्या कड्यांची कोणतीही ऑर्डर दिली नसल्याचे आणि त्याच्याकडे पैसेही जमा केले नसल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर कुटुंबीयांनी सोहमच्या आई-वडिलांशी संपर्क साधला. त्यांनी सव्वा लाख रुपये परत केल्याची माहिती आहे. मात्र उर्वरित 2 लाख 78 हजार 260 रुपये परत न मिळाल्याने सविता दहिवाळ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी सोहम नितीन शहाणे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.