Friday, February 13, 2026 09:21:58 AM

Crime News : क्रौर्याची परिसीमा! कष्टाने शिकवून पायावर उभं केलं, तिनेच आई-वडिलांना संपवलं; का केला भयंकर गुन्हा?

तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका नर्सने आपल्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या जन्मदात्या पालकांचा औषधाचा ओव्हरडोस देऊन काटा काढला.

crime news  क्रौर्याची परिसीमा कष्टाने शिकवून पायावर उभं केलं तिनेच आई-वडिलांना संपवलं का केला भयंकर गुन्हा

Nurse Kills Parents Telangana : तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील याचारम गावात राहणाऱ्या 25 वर्षीय नक्काला सुरेखा या नर्सने आपल्या आई-वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. सुरेखा संगारेड्डी येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती. तिचे सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते आणि तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. मात्र, तो तरुण दुसऱ्या जातीचा असल्याने तिची आई लक्ष्मी (54) आणि वडील दशरथ (58) यांनी या विवाहास स्पष्ट नकार दिला होता. याच रागातून सुरेखाचा घरी अनेकदा वाद व्हायचा आणि अखेर तिने पालकांना संपवण्याचा कट रचला.

उपचाराच्या बहाण्याने दिला मृत्यूचा डोस
24 जानेवारीच्या रात्री सुरेखाच्या या क्रूर कटाची अंमलबजावणी झाली. तिने आपल्या आई-वडिलांना अंग दुखत असल्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने विश्वासात घेतले. व्यवसायाने नर्स असल्याने तिच्याकडे वैद्यकीय ज्ञानासह औषधे उपलब्ध होती. तिने पालकांना 'आर्टासिल' (Artacil) नावाच्या भूल देणाऱ्या औषधाचे हाय डोस असलेले इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच दोन्ही पालक बेशुद्ध झाले. त्यानंतर तिने स्वतःच आपल्या भावाला फोन करून आई-वडिलांची शुद्ध हरपल्याचे सांगितले, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये.

हेही वाचा - Crime News: अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; प्रियकराने घरी बोलावलं, मित्रांसह केलं असं काही की...

तपासात उघड झाले इंजेक्शनचे रहस्य
घटनेनंतर बेशुद्ध पालकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला, तरी पोलिसांना संशय आला. घराची झडती घेतली असता पोलिसांना वापरलेली सिरिंज आणि काही संशयास्पद वैद्यकीय साहित्य सापडले. पोलिसांनी सुरेखाची सखोल चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. प्रोफेशनल पद्धतीने हत्या करून हा अपघात दाखवण्याचा तिचा प्रयत्न होता, पण तांत्रिक पुराव्यांनी तिचे पितळ उघडे पाडले.

नर्स मुलीला बेड्या आणि न्यायालयीन कोठडी
बंटवारम पोलिसांनी बुधवारी आरोपी सुरेखाला अटक केली असून तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. प्रेमात मिळालेल्या नकाराने एक मुलगी आपल्याच पालकांच्या जीवावर उठू शकते, या विचाराने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. ज्या हातांनी रुग्णांची सेवा करायची, त्याच हातांनी आपल्या आई-वडिलांना मृत्यूचे इंजेक्शन दिल्याने वैद्यकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस आता या प्रकरणात तिचा प्रियकर किंवा अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Child Trafficking Racket : आंतरराज्यीय बाल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; नवजात बाळाची सुटका, तिघांना अटक


सम्बन्धित सामग्री