अहमदाबाद : गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉडने (Anti Terrorist Sqaud, ATS) मोठी कारवाई करत संभाव्य दहशतवादी कट रचणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये चीनमधून एमबीबीएस केलेला डॉक्टर अहमद मोहियुद्दीन सय्यद याचाही समावेश आहे. अत्यंत प्राणघातक रासायनिक विष ‘रिसीन’ तयार करत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याचा हँडलर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या संघटनेशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. अटक केलेल्या इतर दोघांची ओळख आझाद सुलेमान शेख आणि मोहम्मद सुहैल मोहम्मद सलीम अशी झाली आहे. हे तिघे मिळून लखनऊ, दिल्ली आणि अहमदाबादमधील संवेदनशील ठिकाणांची पाहणी (रेकी) केल्याचे ATS ने सांगितले आहे.
गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सय्यद हा उच्च शिक्षित असून तो पूर्णपणे कट्टर बनला होता. तो निधी उभारणी आणि तरुणांची भरती करून मोठ्या दहशतवादी कारवायांची तयारी करत होता. त्याने पाकिस्तान सीमेवरून ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रांची खेप मागवली असल्याची माहितीही मिळाली आहे. 7 नोव्हेंबर रोजी गंधीनगरमधील अडालज परिसरात एटीएसने सय्यदला अटक केली. त्याच्याकडून दोन ग्लॉक पिस्तुल, एक बेरेटा पिस्तुल, 30 जिवंत काडतुसे आणि चार लिटर कॅस्टर ऑईल जप्त करण्यात आले. तपासात समोर आले की, सय्यदने चीनमध्ये एमबीबीएस केल्यानंतर भारतात परत येऊन ‘रिसीन’ नावाचं विष तयार करण्याचा संशोधनप्रकल्प सुरू केला होता. त्याने विष तयार करण्यासाठी आवश्यक उपकरणं आणि कच्चा माल गोळा केला होता आणि प्राथमिक रासायनिक प्रक्रिया देखील सुरू केली होती.
हेही वाचा: America Shutdown Impact : शटडाऊनचा फटका ! अमेरिकेत हवाई वाहतुकीवर परिणाम, 2100 उड्डाणे रद्द, 7000 पेक्षा अधिक...
‘रिसीन’ हे कॅस्टर बियांच्या प्रक्रियेनंतर उरलेल्या पदार्थांपासून तयार होणारे एक अत्यंत घातक रासायनिक विष आहे. त्याचे अल्प प्रमाण देखील मनुष्याला ठार करू शकते. एटीएसनुसार सय्यद, शेख आणि सलीम हे तिघे गुजरातमध्ये शस्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी आले होते आणि ‘रिसीन’ वापरून मोठी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत होते. चौकशीत सय्यदने कबूल केलं की त्याने शस्त्रास्त्रांची खेप गंधीनगर जिल्ह्यातील कालोल येथील निर्जन ठिकाणाहून घेतली. त्याचा हँडलर अबू खालिद हा अफगाणिस्तानमधील संघटनेसोबत संबंधित असून त्याचे पाकिस्तानातील अनेक व्यक्तींशी संबंध असल्याचंही उघड झालं आहे.
उत्तर प्रदेशमधील आझाद शेख आणि मोहम्मद सलीम यांना एटीएसने बनासकांठा जिल्ह्यातून अटक केली. त्यांनी राजस्थानमधील हनुमानगड येथून शस्त्रं मिळवून सय्यदपर्यंत पोहोचवल्याचं मान्य केलं आहे. त्यांच्या ताब्यातून तीन मोबाईल फोन आणि दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. तपासात समोर आलं की त्यांनी गेल्या वर्षभरात अनेक ठिकाणी संवेदनशील स्थळांची गुप्त पाहणी केली होती. डीआयजी जोशी म्हणाले की, सध्या कोणतीही स्थानिक ‘स्लीपर सेल’ आढळलेली नाही, मात्र तपास स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. एटीएस केंद्रीय आणि राज्य सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधून इतर संबंधित आरोपींना अटक करणार आहे.
या तिघांविरुद्ध अनधिकृत क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डॉ. सय्यदला 17 नोव्हेंबरपर्यंत एटीएस कोठडी सुनावली गेली आहे, तर उर्वरित दोघांना न्यायालयात रविवारी हजर केले जाणार आहे. या कारवाईमुळे गुजरात एटीएसने देशात होऊ घातलेल्या एका मोठ्या दहशतवादी कटावर पाणी फेरले आहे, असं सुरक्षा यंत्रणांचे मत आहे.
हेही वाचा: भारतातील 'या' राज्याचा कठोर कायदा, दुसरे लग्न केल्यास होणार तुरूंगवास