नवी मुंबई हादरलं! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू? वाशी मनपा रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा गोंधळ

वाशी मनपा रुग्णालयात प्रसूतीनंतर नवजात बाळाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला.

नवी मुंबई हादरलं! डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बाळाचा मृत्यू? वाशी मनपा रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांचा गोंधळ
Vashi Municipal Hospital

वाशी: नवी मुंबईतील वाशी मनपा रुग्णालयात नवजात बाळाच्या मृत्यूवरून मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. प्रसूतीनंतर बाळ मृत अवस्थेत जन्मल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी मिलन दास यांना प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी वाशी मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही त्यांची पहिलीच प्रसूती होती. 4 ऑक्टोबर रोजी डॉक्टरांनी सुरुवातीला सामान्य प्रसूतीचा प्रयत्न केला. मात्र, अनेक प्रयत्न करूनही प्रसूती यशस्वी न झाल्याने अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: शिवसेना नगरसेवकाला अटक, सागर भारुकांची हॉटेलमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

शस्त्रक्रियेनंतर बाळाचा जन्म झाला. मात्र, जन्मानंतर बाळ मृत असल्याचे आढळून आले. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घातला. या प्रकारामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

कुटुंबीयांनी संबंधित डॉक्टर आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून बाळाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

हेही वाचा: ड्रग्सच्या ओव्हरडोसने पोरगं जमिनीवरचं तडफडतं राहिलं! मालाडमध्ये 20 वर्षीय तरुण जिवानिशी गेला

दरम्यान, कुटुंबीयांच्या आरोपांनंतर रुग्णालय प्रशासनाने आपली बाजू स्पष्ट केली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचा गर्भातच दुर्दैवी मृत्यू झाला होता. डॉक्टर रुग्णासोबतच होते आणि उपचारादरम्यान त्यांनी रुग्णाला सोडून कुठेही पळ काढला नाही, असा खुलासा वैद्यकीय अधीक्षकांनी केला आहे.

त्यामुळे बाळाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला आणि या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का, याबाबत पुढील चौकशीनंतरच अधिक स्पष्टता येणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number