तेलंगणातील हैदराबाद शहरातून एक अत्यंत हादरवणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या 29 वर्षीय तरुणीने राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन टोकाचं पाऊल उचललं. यापूर्वी तिने आपल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करून, त्याने तिच्याशी लग्न केले नाही तर ती स्वतःचे आयुष्य संपवून टाकेल, अशी धमकी दिली होती. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
व्हिडीओ कॉलवर ओढणीचा फास दाखवून दिली धमकी
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळची उत्तर प्रदेशची असलेली ही तरुणी हैदराबादमधील एका नामांकित कंपनीत ‘सीनिअर असोसिएट’ म्हणून कार्यरत होती. ती गेल्या 4 वर्षांपासून उत्तराखंडमधील एका सहकाऱ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. संबंधित तरुण सध्या आपल्या घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेतून जात आहे. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास तिने त्या सहकाऱ्याला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी तो आपल्या आईसोबत एका कार्यक्रमात होता. कॉल सुरू असतानाच तिने पंख्याला ओढणीचा फास दाखवत लग्नासाठी दबाव टाकला. घाबरलेला तरुण पहाटे साडेपाचच्या सुमारास तिच्या फ्लॅटवर पोहोचला, मात्र दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर ‘डायल 112’ वर संपर्क साधून पोलिसांनी दरवाजा तोडला असता ती मृतावस्थेत आढळली.
दुसऱ्या एका घटनेत, मुंबईतील माटुंगा येथील प्रसिद्ध ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (ICT) मधील केमिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहातील खोलीत टोकाचं पाऊल उचललं होतं. हा विद्यार्थी मागील काही दिवसांपासून नैराश्यातून होता. यासाठी त्याच्यावर उपचारही सुरू होते. मंगळवारी रात्री उशिरा त्याने आपल्या डॉक्टरांना फोन करून टोकाचे पाऊल उचलण्यासंदर्भातील विचार बोलून दाखवला होता.
हेही वाचा – मुलांच्या भांडणाचा भयंकर शेवट! जावेने दीराच्या गुप्तांगासोबत…,तब्बल 55 टाके घालण्याची वेळ; घडलं काय?
डॉक्टरांनी तातडीने त्याच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सतर्क केले. मित्रांनी खोलीत जाऊन पाहणी केली असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एकापाठोपाठ एक घडलेल्या या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे शैक्षणिक आणि कॉर्पोरेट वर्तुळात तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.