Tuesday, November 18, 2025 09:37:05 PM

मन हेलावणारी घटना! चित्रपट प्रदर्शनाच्या अगदी तोंडावर मराठी अभिनेत्यानं स्वतःला संपवलं; सचिन चांदवडेच्या जाण्यानं हळहळ

सचिन चांदवडेच्या कुटुंबीयांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

मन हेलावणारी घटना चित्रपट प्रदर्शनाच्या अगदी तोंडावर मराठी अभिनेत्यानं स्वतःला संपवलं सचिन चांदवडेच्या जाण्यानं हळहळ

Sachin Chandwade Suicide : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री, गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांचे निधन झाले आहे किंवा काहींनी आत्महत्या केली आहे, अशा बातम्या येत आहेत. अशातच, मूळचा जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावचा रहिवासी असलेल्या 25 वर्षीय अभिनेता आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन चांदवडे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

अभिनय आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग
सचिन चांदवडे हा पुण्यातील एका प्रतिष्ठित आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. परंतु, लहानपणापासूनच त्याला अभिनयाची प्रचंड आवड होती. या आवडीतूनच त्याने सिनेसृष्टीत आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली होती. तो लवकरच 'जमतारा 2' आणि 'असुरवन' या वेबसीरिज आणि चित्रपटांमध्ये झळकणार होता. या चित्रपटांविषयीची माहिती त्याने काही काळापूर्वीच सोशल मीडियावर शेअर केली होती. विशेष म्हणजे, त्याचा 'असुरवन' चित्रपट प्रदर्शित होण्यास काहीच दिवस बाकी होते. याशिवाय, तो 'विषय क्लोज' या चित्रपटातही दिसला होता.

हेही वाचा -  Sachin Pilgaonkar On Satish Shah: 'मृत्यूच्या काही तास आधी...'; सचिन पिळगावकरांनी केला धक्कादायक खुलासा

मृत्यूशी झुंज अपयशी

ही दुर्दैवी घटना 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सचिनने आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांना हे लक्षात येताच त्यांनी त्याला तात्काळ खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी धुळे येथे हलवण्यात आले. दुर्दैवाने, 24 ऑक्टोबर रोजी रात्री दीड वाजता उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.

गावात आणि इंडस्ट्रीत हळहळ
मृत्यूच्या अवघ्या पाच दिवसांपूर्वीच सचिनने आपल्या इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपटांविषयी पोस्ट शेअर करून आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल उत्साह व्यक्त केला होता. तो ढोल-ताशा पथकातही सक्रिय होता आणि त्याने गणेशोत्सव यांसारख्या सणांमध्ये अनेक मराठी कलाकारांसोबत ढोल वादन केल्याचे फोटोही शेअर केले होते. एका तरुण, प्रतिभावान आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या अशा अचानक जाण्याने उंदिरखेडे गावात तसेच मराठी मनोरंजन विश्वात गहन हळहळ व्यक्त होत आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावरून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. या घटनेबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे.

हेही वाचा - Prarthana Behere: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या वडिलांचे रस्ता अपघातात निधन; सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट


सम्बन्धित सामग्री