Prarthana Behere: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या वडिलांचे 14 ऑक्टोबर रोजी एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. या दुःखद घटनेनंतर प्रार्थनाने आपल्या वडिलांच्या आठवणींनी भरलेली एक हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत प्रार्थनाने लिहिलं आहे की, 'मर के भी किसी को याद आएंगे किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है.. माझे बाबा… 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले. बाबा... तुमच्या जाण्यानंतर आयुष्य जणू थांबल्यासारखं वाटतंय, तुमचं हास्य अजूनही आमच्या कानात गुंजतं, तुमचा आत्मविश्वास आमच्या मनाला बळ देतो, आणि तुमचं जीवन पाहून आम्हाला शिकायला मिळालं की आनंद म्हणजे परिस्थिती नव्हे, तर दृष्टिकोन असतो. तुमचा प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि लोकांप्रती असलेलं निस्सीम प्रेम आम्हाला माणुसकीचं खरं मूल्य शिकवून गेलं. तुम्ही आम्हाला शिकवलंत की इतरांना मदत करणे हेच खरं समाधान आहे.'
हेही वाचा - Mahesh Manjrekar : 'आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे दीड वर्षात सिनेमा...' दिग्दर्शक महेश मांजरेकरांचे धक्कादायक भाकीत.. म्हणाले, 'आता आपण गुपचुप...'
प्रार्थनाने पुढे लिहिलं आहे की, 'आज तुम्ही आमच्यासोबत नसला तरी तुमचा आवाज आणि गाणी आम्हाला सतत बळ देतात. तुमची अचानक झालेली exit, मनाला भयंकर लागली आहे. काल परवा पर्यंत सगळ अलबेल होतं. तुमच्या अकाली जाण्याने आम्ही सगळेच खुप दुखावलो आहोत. प्रत्येक क्षणी तुमची आठवण येतच रहाणार आहे. पण या सगळ्या घटनेला वेगळ्या दृष्टीने पाहीलं तर, तुम्ही अधिक प्रत्येकाच्या जवळ रहाणार आहात. कारण तुम्ही स्मरणात रहाणार. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, आम्ही आमच्या मनाला वाटेल तेव्हा, तुमच्याशी संवाद साधू शकतोय.'
हेही वाचा - Sachin Pilgaonkar On Satish Shah: 'मृत्यूच्या काही तास आधी...'; सचिन पिळगावकरांनी केला धक्कादायक खुलासा
दरम्यान, अभिनेत्रीने पुढे म्हटलं आहे की, 'तुम्हाला आजपर्यंत अभिमान वाटेल अशीच कामगिरी मी करत आली आहे. आता अधिक जोमाने कामाला सुरुवात करणार आहे. तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला माझ्या अप्रतिम कामाने श्रध्दांजली अर्पण करत रहाणं, हे माझं कर्तव्य आहे. डोळ्यातलं पाणी कधीच तुम्हाला दिसू नये याची काळजी घेईन. कारण मलाही तुम्हाला धूसर पहायचं नाही. तुमचं ओठावरचं हसू, मनात घर करून राहीलं आहे. तेच टिकवण्याची जबाबदारी मी घेणार आहे. काळजी करू नका... मी खुप strong आहे. कारण तुम्ही माझ्या पाठीशी नाही तर, सोबत आहात याची खात्री आहे.' या पोस्टनंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी प्रार्थनाला धीर देत, तिच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.