Mahesh Manjrekar : सध्या प्रत्येक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कंटेंट निर्मिती असो, नवीन गोष्टी शिकणे असो किंवा फोटो तयार करणे असो—एआय (AI) च्या मदतीने ही सर्व कामे अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होत आहेत. या तंत्रज्ञानाने मनोरंजन क्षेत्रातही प्रवेश केला असून, यामुळे येत्या काळात माणसांच्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याची चर्चा आहे. याच संदर्भात दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी एक अत्यंत मोठे भाकीत केले आहे.
'AI'मुळे सिने उद्योगाला धोका
गेली दोन दशके मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या महेश मांजरेकरांनी नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्ट मत व्यक्त केले की, “माझं मत आहे की, दीड वर्षात सिनेमा बंद होईल. बंद म्हणजे बंद.” त्यांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाच्या निमित्ताने त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत हे धोकादायक भाकीत केले. ते म्हणाले की, एआय आता सगळ्यावर भारी पडत आहे, ज्यामुळे सिने उद्योगाचे भविष्य धोक्यात आले आहे.
'AI'ची क्षमता आणि खर्च
मांजरेकर यांनी 'एआय'ने बनवलेल्या सिनेमाच्या ट्रेलरचे उदाहरण दिले. ते म्हणाले, "तुम्ही एआयने बनवलेल्या सिनेमाचे ट्रेलर पाहिल्यास, त्यातील व्हिज्युअल्स तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवणं शक्यच नाही. तुम्ही कितीही चांगले व्हीएफएक्स केलेत तरी एआयने बनवलेल्या सिनेमांसारखे व्हिज्युअल्स दाखवणं शक्य नाही." ते पुढे सांगतात की, एआयच्या मदतीने मी आज घरबसल्या 'टायटॅनिक' सिनेमासारखा उत्कृष्ट लायटिंग, चांगला हिरो आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम सिनेमा करू शकतो. त्यांनी 'महाभारत' चा ट्रेलर पाहिल्याचे सांगितले, जो अक्षरशः 'डोळे दिपवणारा' होता.
हेही वाचा - Sachin Pilgaonkar On Satish Shah: 'मृत्यूच्या काही तास आधी...'; सचिन पिळगावकरांनी केला धक्कादायक खुलासा
कलाकार आणि खर्चावर परिणाम
महेश मांजरेकर पुढे म्हणाले, "जर हे सगळं एका क्लिकवर होणार असेल, तर लोक कलाकारांवर का पैसे खर्च करतील?" त्यांनी स्पष्ट केले की, एआय वापरण्यासाठी निश्चितच हुशारी लागेल; पण फक्त सहा महिन्यांपूर्वीच्या आणि आत्ताच्या एआयमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. "ज्या दिवशी त्यांच्या हाती सिनेमा बनवण्याचा कोड लागेल, त्या दिवशी आपण संपणार. रोज 10 हजार सिनेमे बनतील आणि याला काही खर्चही येत नाही," असे गंभीर मत त्यांनी व्यक्त केले.
पुढील मार्ग आणि आवाहन
मांजरेकरांनी एका मित्राचे उदाहरण दिले, ज्याने एआयच्या मदतीने फक्त दोन हजार रुपयांत ॲड फिल्म बनवली. यामुळे अनेक लोक एआयवर सिनेमे बनवतील, पण ते बघणार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मांजरेकरांच्या मते, हे खूपच धोकादायक आहे. म्हणूनच, त्यांनी सगळ्यांना आता गुपचूप नाटकांकडे वळले पाहिजे, असे आवाहन केले आहे. येत्या दीड वर्षांत सिनेमा बंद होणार, हे माझे भाकीत आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हेही वाचा - Sumeet Raghavan Emotional Post : सुमीत राघवनने सांगितली 'साराभाई वर्सेस साराभाई'ची ही आठवण; म्हणाले, 'मोठा मुलगा या नात्याने....'