Sachin Pilgaonkar On Satish Shah: हिंदी आणि मराठी मनोरंजनविश्वाला शनिवारी मोठा धक्का बसला. लोकप्रिय अभिनेता सतीश शाह यांचे 25 ऑक्टोबर रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. काही काळापासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सतीश शाह यांच्या निधनानंतर त्यांच्या जिवलग मित्राने म्हणजेचं ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकरांनी, एक भावनिक आठवण शेअर केली आहे. सचिन यांनी सांगितले की, सतीश शाह यांनी निधनापूर्वी काही तास आधीच त्यांना शेवटचा मेसेज पाठवला होता.
तो पूर्णपणे ठीक होता; सचिन यांची प्रतिक्रिया
सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे की, 'सुप्रिया तीन दिवसांपूर्वी सतीश आणि त्यांच्या पत्नी मधुला भेटायला गेली होती. तेव्हा कोणीतरी गाणं ऐकवलं. त्यावर सुप्रिया व मधु दोघींनीही थोडा डान्स केला. आम्ही दोघे नेहमी संपर्कात असायचो. एकमेकांना मेसेज करत असायचो. आज दुपारी बरोबर 12:56 वाजता सतीशचा मेसेज आला होता. तो अगदी ठीक होता. पण काही तासांतच त्याच्या निधनाची बातमी आली. यामुळे मला मोठा धक्का बसला.'
हेही वाचा - Salman Khan: पाकिस्तानचा धक्कादायक निर्णय! सलमान खानला ‘दहशतवादी’ घोषित केलं; अभिनेत्याला अटक होऊ शकते का? जाणून घ्या
सतीश शाह आणि सचिन पिळगावकर यांची ओळख 1987 साली प्रदर्शित झालेल्या ‘गंमत जंमत’ या चित्रपटातून झाली. त्या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही, तर दोघांमध्ये एक घट्ट मैत्रीचे नाते जोडले. सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, 'आम्ही पुन्हा एकत्र काम केलं नाही, पण आमचा संवाद कायम राहिला. सतीश नेहमी आनंदी राहायचा आणि इतरांनाही आनंद देत राहायचा. आयुष्याचं काहीच भाकीत करता येत नाही. त्यामुळे आनंदात राहणं आणि इतरांना आनंद देणं हेच खरं जीवन आहे. हे सतीशने आपल्या आयुष्यात दाखवून दिलं.'
हेही वाचा - Satish Shah Marathi Film Journey: ‘गंमत जंमत’ ते ‘वाजवा रे वाजवा’…सतीश शाह यांनी मराठी चित्रपटातही उमटवला ठसा
सतीश शाह यांनी ‘ये जो है जिंदगी’, ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘मैं प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले. त्यांच्या अभिनयाची झलक विनोदातून ते भावनेतून, प्रत्येक भूमिकेत दिसली. त्यांच्या जाण्याने एक बहुआयामी कलाकार आणि आनंद देणारा माणूस कायमचा हरपला आहे.